मुर्तिजापूरातील पत्रकार मारहाण प्रकरणातील आरोपींवर कडक कारवाई करावी
*लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाची पोलिस अधिक्षकांकडे मागणी*
*'सरकार माझा न्यूज'च्या शर्मा यांचेवर झालेला जीवघेणा हल्ला*
*वरली-मटका व भ्रष्टाचाराविरोधातील वृत्तांकनाचा राग धरून मारहाण.*
*अकोला* - मुर्तिजापूर येथील नगरपरिषद प्रशासनातील गैरप्रकार आणि शहरातील अवैध धंद्यांविरोधात आवाज उठवणारे 'सरकार माझा न्यूज' या डिजिटल पोर्टलचे पत्रकार प्रेमराज कैलास शर्मा यांच्यावर समाजकंटकांनी भ्याड हल्ला केल्याची धक्कादायक घटना मुर्तिजापूर येथे घडली आहे.राज्यातील पत्रकारांवर हल्ला होण्याचे प्रकार वाढीस लागले असून १२ ऑगस्ट रोजी रात्रीच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे अकोला जिल्ह्यातील पत्रकार वर्गात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणी संबंधित आरोपींवर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ या समाजाभिमुख राष्ट्रीय संघटनेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष संजय एम.देशमुख (निंबेकर ) यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक अर्चित चांडक यांचेकडे केली आहे.यावेळी लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे पदाधिकारी,सभासद आणि मुर्तिजापूर व अकोला येथील बहुसंख्य पत्रकारांची उपस्थिती होती.
भ्रष्टाचार आणि अनाचाराविरूध्द बातम्या प्रसारीत करणे हे पत्रकारांचे संविधानिक हक्क आहेत.परंतू प्रेमकुमार शर्मा यांनी नगरपरिषदेतील भ्रष्टाचाराच्या आणि वरली मटका व अवैध धंद्याच्या विरोधात आवाज उठवला म्हणून त्यांना मारहाण करण्यात आली.ही दडपशाही म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर आघात आहे .अशा समाजविघातक हल्ल्यांना प्रतिबंध व्हावा म्हणून या प्रकरणात तात्काळ कारवाई व्हावी अशी आ लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ आणि जिल्ह्यातील पत्रकार महासंघाची मागणी आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पत्रकार प्रेमराज शर्मा यांनी गेल्या काही दिवसांत नगरपरिषदेतील कथित 'पतीराज' कारभार, शहरातील वरली-मटका, बेकायदेशीर जुगार क्लब आणि प्रशासकीय गटबाजीवर परखड वृत्तमालिका प्रसिद्ध केली होती. या बातम्यांचा राग मनात धरून १२ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री १ वाजताच्या सुमारास शर्मा यांना बोलणी करण्याच्या बहाण्याने स्टेशन विभागातील मशिदीजवळ बोलावण्यात आले.पत्रकार शर्मा तेथे पोहोचले असता, पूर्वी ठरलेली व्यक्ती न येता चारचाकी वाहनातून आलेल्या अक्षय कोळवले आणि त्याच्या साथीदारांनी "जास्त बातम्या लावून राहिला, तुझ्या अंगात जास्त मस्ती आली" असे म्हणत अश्लील शिवीगाळ केली. तसेच त्यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. या अचानक झालेल्या हल्ल्यातून शर्मा यांनी प्रसंगावधान राखून तेथून टीकाच सोडल्याने पुढील मोठा अनर्थ टळला. या प्रकरणी मुर्तिजापूर शहर पोलीस ठाण्यात रीतसर लेखी फिर्याद नोंदवण्यात आली आहे.
या भ्याड हल्ल्याचा मुर्तिजापूर व अकोला जिल्ह्यातील सर्व पत्रकार बांधवांनी जाहीर निषेध केला आहे. हा हल्ला केवळ एका व्यक्तीवर नसून लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर झालेला थेट हल्ला आहे, अशी भूमिका पत्रकारांनी घेतली आहे.कठोर कायदेशीर कलमांनुसार तात्काळ गुन्हे दाखल करून त्यांना अटक करावी.
अवैध धंदे आणि भ्रष्टाचाराविरोधात लिहिणाऱ्या पत्रकारांच्या सुरक्षेची जबाबदारी प्रशासनाने घ्यावी.भविष्यात कोणत्याही पत्रकारावर दबावाचे किंवा धमकावण्याचे प्रकार घडू नयेत यासाठी कठोर पावले उचलावीत.पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी या प्रकरणात तातडीने लक्ष घालून दोषींवर कडक कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली. निवेदन सादर करताना राष्ट्रीय अध्यक्ष संजय देशमुख यांचे सोबत लोकस्वातंत्र पत्रकार महासंघाचे प्रदीप खाडे (उपाध्यक्ष),राजेंद्र देशमुख (सचिव) सौ जया भारती इंगोले (राष्ट्रीय पदाधिकारी), सागर लोडम ( जिल्हाध्यक्ष ग्रामीण ) बुडन गाडेकर, मोहम्मद फिरोज, विजय देशमुख ,फुलचंद वानखडे ,रमेश ह. समुद्रे, प्रेमराज शर्मा, मनीष राऊत ,विलास कवळे,मनोहर मोहोड, अरुण गणोरकर ,दीपक शिरसाठ, अमित इंगळे, संतोष मोरे, तेजस विजय वानखडे तसेच लोकस्वातंत्र पत्रकार महासंघ (राष्ट्रीय) समाजाभिमुख संघटनेचे राष्ट्रीय पदाधिकारी तथा जिल्हा कार्यकारिणी सदस्य व अनेक पत्रकार उपस्थित होते.
Post Views: 2