शासन स्तरावर लघुलेखक (Stenographer) हे पद Vanishing Cadre म्हणून घोषित करण्यापूर्वी विचारार्थ एक मत ...
विश्वाप्रभात न्यूज ब्युरो
15 Apr 2026, 1:15 PM
शासन स्तरावर लघुलेखक (Stenographer) हे पद Vanishing Cadre म्हणून घोषित करून टप्प्याटप्प्याने नष्ट करण्याचा विचार सुरू असल्याची माहिती अत्यंत चिंताजनक व गंभीर स्वरूपाची आहे. विचार करून पाहिल्यास हा प्रस्ताव केवळ एका पदाच्या समाप्तीपुरता मर्यादित नसून, तो शासनाच्या प्रशासकीय कार्यपद्धती, कौशल्याधारित शिक्षण व्यवस्था आणि हजारो विद्यार्थ्यांच्या भविष्यावर दूरगामी परिणाम करणारा आहे. त्यामुळे या निर्णयाचा व्यापक व सखोल पुनर्विचार होणे अत्यावश्यक आहे.
लघुलेखक हे पद शासनाच्या प्रशासकीय व्यवस्थेतील एक महत्त्वपूर्ण आणि विश्वासार्ह घटक आहे, नाही कां ? बघा, वर्षा नू वर्षे आपण पाहतो की, वरिष्ठ अधिकाऱ्यांचे विचार, बैठकीतील चर्चासत्रे, धोरणात्मक निर्णय, आदेश व सूचना अचूक, जलद आणि शिस्तबद्ध पद्धतीने नोंदविण्याचे अत्यंत जबाबदारीचे कार्य लघुलेखक पार पाडतात. हे काम केवळ टायपिंग किंवा लेखनापुरते मर्यादित नसून, त्यामध्ये श्रवण कौशल्य, वेग, भाषेवर प्रभुत्व, एकाग्रता आणि गोपनीयतेची जाणीव या सर्व गुणांचा समन्वय आवश्यक असतो. अशा प्रकारचे कौशल्य विकसित करण्यासाठी दीर्घकालीन प्रशिक्षण आणि सातत्यपूर्ण सराव आवश्यक असतो.
आजच्या डिजिटल युगात संगणक तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) यांचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला असला, तरी या साधनांची मर्यादा देखील तितकीच स्पष्ट आहे. AI प्रणालींना मानवी संवेदनशीलता, परिस्थितीचे आकलन, संदर्भानुसार निर्णयक्षमता आणि गोपनीयतेची नैतिक जबाबदारी पूर्णतः पेलणे कदापिही शक्य नाही. विशेषतः शासनाच्या संवेदनशील व गोपनीय कामकाजात, मानवी हस्तक्षेप आणि जबाबदारी अनिवार्य ठरते. त्यामुळे लघुलेखक हे पद तंत्रज्ञानाने पूर्णपणे बदलण्यासारखे नाही, तर तंत्रज्ञानासोबत पूरक स्वरूपात अधिक सक्षम होऊ शकते, असा विचार करणे आवश्यक नव्हे तर अनिवार्य आहे.
निदर्शनास येईल की, अनेक शासकीय विभागांमध्ये आजही तातडीच्या बैठका, गोपनीय चर्चा, न्यायालयीन प्रक्रिया आणि धोरणनिर्मितीच्या टप्प्यांमध्ये अचूक व जलद नोंदी ठेवण्याची गरज असते. अशा परिस्थितीत प्रशिक्षित लघुलेखकांची भूमिका अत्यंत मोलाची ठरते. त्यांच्या कार्यामुळे प्रशासनाला गती, अचूकता आणि शिस्त प्राप्त होते. त्यामुळे हे पद नष्ट करणे म्हणजे प्रशासनातील एक महत्त्वाचा आधारस्तंभ कमकुवत करणे होय, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
याशिवाय, देशातील आणि राज्यातील विविध स्पर्धा परीक्षा जसे की SSC, MPSC आणि इतर भरती प्रक्रियांमध्ये स्टेनोग्राफर पदासाठी मोठ्या प्रमाणावर उमेदवार तयारी करत आहेत. ग्रामीण आणि शहरी भागातील हजारो विद्यार्थी या कौशल्याच्या आधारे रोजगाराच्या संधी शोधत आहेत. हे पद रद्द झाल्यास त्यांच्या आशा-अपेक्षांवर पाणी फेरले जाईल आणि बेरोजगारीची समस्या अधिक तीव्र होईल, याचाही प्राधान्याने विचार करणे गरजेचे आहे. तसेच सर्वात महत्वाचे म्हणजे राज्यभरात गेल्या अनेक दशकांपासून कार्यरत असलेल्या टंकलेखन व शॉर्टहॅण्ड प्रशिक्षण संस्था हजारो विद्यार्थ्यांना दर्जेदार, रोजगाराभिमुख प्रशिक्षण देत आहेत. या संस्था केवळ शिक्षण देत नाहीत, तर विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, कौशल्य आणि स्वावलंबन निर्माण करतात. लघुलेखक पद नष्ट झाल्यास या संस्थांचे अस्तित्व धोक्यात येईल आणि कौशल्याधारित शिक्षण व्यवस्थेलाही मोठा फटका बसेल, नाही कां ?
शासनाने तंत्रज्ञानाचा स्वीकार करणे हे निश्चितच काळाची गरज आहे; परंतु त्याच वेळी पारंपरिक आणि आवश्यक अशा पदांचे महत्त्व ओळखून त्यांचे संवर्धन करणेही तितकेच महत्त्वाचे आहे, हे स्पष्ट करणे आवश्यक आहे. लघुलेखक हे पद कालबाह्य नसून, आजच्या बदलत्या प्रशासनातही ते तितकेच उपयुक्त आणि आवश्यक आहे. म्हणूनच शासनाने या विषयाकडे केवळ खर्चकपात किंवा आधुनिकीकरणाच्या दृष्टीकोनातून न पाहता, प्रशासनाची कार्यक्षमता, विद्यार्थ्यांचे भविष्य आणि कौशल्याधारित शिक्षण यांचा विचार करून निर्णय घ्यावा. लघुलेखक (Stenographer) हे पद Vanishing Cadre म्हणून नष्ट करण्याचा प्रस्ताव तात्काळ मागे घ्यावा आणि या पदाला भविष्यात अधिक सक्षम व आधुनिक स्वरूपात टिकवून ठेवण्याचा सकारात्मक निर्णय घ्यावा, हीच नम्र व ठाम विनंती आहे.
प्राचार्य नितीन सुरेखा शरद भोळे, अकोला.
Post Views: 2