बार्शिटाकळी तालुक्यात नऊ संस्था अवसायनात
महिनाभरात आक्षेप दाखल करण्याचे आवाहन
विश्वाप्रभात न्यूज ब्युरो
27 Aug 2024, 8:36 PM
अकोला : बार्शिटाकळी येथील सहकारी संस्था सहायक निबंधकांकडून तालुक्यातील नऊ सहकारी संस्था अंतिम अवसायनात घेण्यात आलेल्या आहेत.
याबाबत सहायक निबंधकांनी दि. 20 ऑगस्ट रोजी आदेश निर्गमित केला. अवसायनाबाबत काही स्पष्टीकरण, हरकत, आक्षेप असल्यास एका महिन्यात म्हणणे सादर करावे अन्यथा नोंदणी रद्द होईल, असा इशारा सहायक निबंधक ए. एस. शास्त्री यांनी दिला आहे.
बार्शिटाकळी येथील जनकल्याण कृषी विषयक सर्वसेवा उद्योग सहकारी संस्था, रेडवा येथील राजराजेश्वर अभिनव शेती विविध तंत्रज्ञान संगोपन व समृद्धी संस्था, खडकी येथील जय मुंगसाजी आदिवासी गृहनिर्माण संस्था, पिंजर येथील रोहिदास अनु. जाती गृहनिर्माण संस्था व संत सेवालाल मागास गृहनिर्माण सह. संस्था, बार्शिटाकळी येथील अलहिरा पार्क गृहनिर्माण सह. संस्था, महात्मा फुले दुधपूर्णा प्रकल्प अभिनव सहकारी संस्था, कासमार येथील अभिनव मागास गृहनिर्माण संस्था, टिटवन येथील जय विरसा अभिनव शेती विविध तंत्रज्ञान संगोपन व समृद्धी सहकारी संस्था आदी संस्था अवसायनात ठरविण्यात आल्या आहेत.
Post Views: 28