गृह मतदानासाठी तारखा निश्चित; मतदान पथके घरी पोहोचणार
गृह मतदानाचा विकल्प दिलेल्या मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा - निवडणूक निर्णय अधिकारी अजित कुंभार
विश्वाप्रभात न्यूज ब्युरो
13 Apr 2024, 8:17 AM
अकोला : लोकसभा मतदार संघातील 726 दिव्यांग व 85 वर्षापुढील 1 हजार 632 मतदार अशा एकूण 2 हजार 358 मतदारांना गृह मतदानाची सुविधा देण्यात आली असून या मतदारांनी निवडणूक आयोगांनी निश्चित केलेल्या तारखांना घरी उपस्थित राहून मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी अजित कुंभार यांनी केले आहे.
गृह मतदानासाठी प्राप्त विकल्पानुसार मतदार निश्चित करण्यात आले असून स्वतंत्र मतदान पथके नियुक्त करण्यात आले आहे. ही मतदान पथके नेमून दिलेल्या तारखांना मतदान नोंदविण्याकरीता संबंधीत मतदानाच्या घरी पोहोचणार आहेत.
अकोट विधानसभा मतदार संघ, तसेच अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघातील मतदारांना गृह मतदानासाठी भेटीचा दिनांक 18 व 19 एप्रिल किंवा आवश्यकता वाटल्यास 22 एप्रिल असा आहे.
बाळापूर मतदारसंघातील मतदारांना गृह मतदानासाठी भेटीचा दिनांक 15 व 16 एप्रिल असून किंवा आवश्यकता वाटल्यास 19 एप्रिल असा आहे. अकोला पूर्व मतदारसंघातील मतदारांना गृह मतदानासाठी भेटीचा दिनांक 15 व 16 एप्रिल असून किंवा आवश्यकता वाटल्यास दुसऱ्या भेटीचा दिनांक 20 व 21 एप्रिल असा आहे. मुर्तिजापूर विधानसभा मतदारसंघातील मतदारांना गृह मतदानासाठी भेटीचा दिनांक 18 व 19 एप्रिल असून किंवा आवश्यकता वाटल्यास दुसऱ्या भेटीचा दिनांक 20 व 21 एप्रिल असा आहे. रिसोड विधानसभा मतदारसंघातील मतदारांना गृह मतदानासाठी भेटीचा दिनांक 13 व 15 एप्रिल असून किंवा आवश्यकता वाटल्यास दुसऱ्या भेटीचा दिनांक 18 एप्रिल असा आहे.
सर्व संबंधीत दिव्यांग व 85 वर्षापुढील मतदारांनी नमूद दिनांकास घरी राहून निर्भयपणे मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.
Post Views: 147