समाजकार्य महाविद्यालयात संविधान जनजागृती यात्रा व सामाजिक न्याय पर्व सप्ताहाचे उद्घाटन
विश्वप्रभात न्यूज ब्युरो
26 Nov 2022, 7:54 PM
ग्रामीण विकास शिक्षण व क्रीडा प्रसारक मंडळ द्वारा संचालित स्थानिक श्रीमती पंचफुलादेवी पाटील समाजकार्य महाविद्यालय येथे मा. सहा. आयुक्त समाज कल्याण अकोला व जिल्हा परिषद समाज कल्याण कार्यालय अकोला आणि श्रीमती पंचफुलादेवी पाटील समाजकार्य महाविद्यालय तसेच महाविद्यालयातील समान संधी केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 26-11-2022 ते 6-12- 2022 या कालावधी सामाजिक न्याय पर्व सप्ताह साजरा करण्यात येत आहे.
त्या अनुषंगाने दिनांक 26-11-2022 रोजी ठीक सकाळी 8.00 वाजता समाजकार्य महाविद्यालयातून संविधान जनजागृती यात्रा काढण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सर्वप्रथम भारतरत्न संविधानाचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व भारतीय संविधानाला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाच्या सुरुवातीला संविधानाच्या उद्देशिकाचे सामूहिक वाचन करण्यात आले, यावेळी संविधान जनजागृती यात्रेचे अध्यक्ष प्रा.डॉ.संकेत काळे (अध्यक्ष ग्रामीण विकास शिक्षण व क्रीडा प्रसारक मंडळ खडकी) कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून मा.श्री.सौरभजी कटियार साहेब (मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अकोला) तसेच प्रमुख पाहुणे श्रीमान डी.एम.पुंड साहेब (जिल्हा समाज कल्याण अधिकारी अकोला) व प्रमुख उपस्थित श्रीमती रेखा.एस.ठाकरे (अधीक्षक समाज कल्याण कार्यालय अकोला) व कार्यक्रमाला उपस्थित श्रीमान आर. एम. भोवळे (विस्तार अधिकारी जिल्हा परिषद समाज कल्याण अकोला) व समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डॉ.केशव गोरे विभाग प्रमुख प्रा.डॉ.संदीप भोवते, श्रीमान उमेश वाघ (स.क.वि.) समान संधी केंद्राचे समन्वयक प्रा.डॉ.केतन वाकोडे प्रा.पांडुरंग पाचपुते, इत्यादी मान्यवर विचार मंचावर उपस्थित होते. संविधान जनजागृती यात्रेला मा.श्री. सौरभजी कटियार साहेब (मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अकोला) यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना असे म्हटले की भारतीय लोकशाही व संविधानाचा प्रचार व प्रसार समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी करावा, देशाच्या शेवटच्या घटकापर्यंत संविधानाबाबत जनजागृती झाली पाहिजे, भारतीय लोकशाही मजबूत करण्यासाठी युवकांचे योगदान मोठ्या प्रमाणात असले पाहिजे, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या अथक परिश्रमाने लिहिलेली भारतीय राज्यघटना 26 नोव्हेंबर 1949 रोजी देशाला अर्पण केली, तेव्हा पासून हा दिवस संविधान दिन म्हणून संबोधल्या जातो असे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले,
यावेळी संविधान जनजागृती कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.प्रा.डॉ.संकेत काळे, श्री पुंड साहेब यांनी संविधान जनजागृती यात्रेला हिरवी झेंडी दिली. संविधान जनजागृती यात्रा खडकी परिसरातून काढण्यात आली, या संविधान यात्रेला शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. सुंदर सजवलेल्या पालखीमध्ये संविधान ग्रंथ ठेवण्यात आला व सदर पालखी वेशभूषा परिधान केलेल्या विद्यार्थ्यांनी संपूर्ण यात्रेमध्ये मिरविली. उत्कृष्ट सजविलेली पालखी सर्वांच्या आकर्षणाचे केंद्र बनली. संविधान जनजागृती यात्रेमध्ये विद्यार्थ्यांनी संविधानाचा जयघोष केला, विद्यार्थ्यांनी संविधानाच्या सन्मानावर विविध घोषणा दिल्यात, तसेच मोठ्या हर्ष उल्हासाने या यात्रेमध्ये आपला सहभाग नोंदविला,
संविधान जनजागृती यात्रेची सांगता राष्ट्रगीता ने करण्यात आली. या कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन प्रा.डाॅ. बळीराम अवचार यांनी केले. तर आभारप्रदर्शन प्रा.पांडुरंग पाचपुते यांनी केले, संविधान जनजागृती यात्रेला महाविद्यालयातील प्राचार्य, सर्व प्राध्यापक वृंद, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी व मा.सहा.आयुक्त समाज कल्याण कार्यालय अकोला, जिल्हा परिषद समाज कल्याण कार्यालय अकोला ,येथील कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
Post Views: 209