गाव कारागीर या सीमा शेटे रोठे लिखित पुस्तकाचा प्रकाशन समारंभ
विश्वाप्रभात न्यूज ब्युरो
25 Aug 2022, 10:11 AM
अकोला : गाव कारागिरांचे जीवन शब्दबद्ध करून सीमा शेटे रोठे यांनी कौशल्य शिक्षण जे आपल्याकडे आहेच त्याकडे अजून विशेष लक्ष देण्याची आवश्यकताच जणू मांडली असे मत विदर्भ साहित्य संघ, अकोला शाखेचे अध्यक्ष विजय कौसल यांनी व्यक्त केले. आकाशवाणीच्या निवेदिका आणि साहित्यिक सीमा शेटे रोठे यांनी लिहिलेल्या गाव कारागीर या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते.
सीमा शेटे-रोठे ह्या मूळ शेतकरी कुटुंबातून आलेल्या असल्याने त्यांच्या लेखणीत आत्मीयता आहे आणि त्यामुळेच पुस्तकात जिवंतपणा आल्याचे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे सदस्य डॉ. गजानन नारे यांनी केले. सीमा शेटे यांचे यापूर्वी वाटलं तसं हे पुस्तक देखील प्रकाशित झालेले आहे. गावकुशीत वास करणाऱ्या गाव कारागिरांचं वास्तव जीवन सर्वांसमोर मांडण्याचा छोटेखानी प्रयत्न केला असल्याचे मत लेखिका सीमा शेटे-रोठे यांनी याप्रसंगी व्यक्त केले.
अविनाश दुधे यांच्या पुढाकाराने ही पुस्तक निर्मिती झाल्याचे आणि डॉ श्रीकांत तिडके यांची प्रस्तावना असल्याने पुस्तक समृध्द झाल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी विदर्भ साहित्य संघ, अकोला शाखा कार्यकारिणीचे सदस्य अशोक ढेरे, सुरेश पाचकवडे, डॉ. प्रा. गजानन मालोकार, विजय देशमुख, दिलीप इंगोले, डॉ विनय दांदळे, डॉ सुहास उगले, नीरज आवंडेकर यांची उपस्थिती होती.
प्रकाशन सोहळ्याचे प्रास्ताविक डॉ विनय दांदळे यांनी तर आभार प्रदर्शन डॉ सुहास उगले यांनी केले. मीडिया वॉच पब्लिकेशनचे हे पुस्तक परंपरागत कारागिरी जपण्याचा नवा संदेश देऊन जाईल असा सूर उपस्थितांमध्ये होता.
Post Views: 254