वैचारिक प्रदुषण आणि वाढत्या मनोविकृती मानवी समाजावरील भयंकर संकट...!


 संजय एम.देशमुख  2022-05-29
   


 संजय एम.देशमुख,
संपादक विश्वप्रभात
 संस्थापक-राष्ट्रीय अध्यक्ष-लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ,अकोला. 
मोबा.क्र ९८८१३०४५४६
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

               जीवन म्हणजे काय? मनुष्य जन्माचा उद्देश काय?मिळालेल्या मनुष्यजीवनाला सर्वांगसुंदर बनविण्यासाठी अंतिम ध्येयाकडे जातांना कोणती दिशा आणि कसा मार्ग निवडावा या मानवी जीवनमुल्यांचे संस्कार ही दुरापास्त गोष्ट झाल्याने मानवी समाजाची झपाट्याने अवनती होत आहे. पाश्चात्य संस्कृतीचे आकर्षण,आपल्यापेक्षा ती जीवनशैली आणि स्वातंत्र्याचा तो स्वैराचार उत्तम वाटायला लागल्याने युवापिढीचा प्रवास प्रगती आणि विकासाऐवजी अंध:काराच्या रसातळाकडे सुरू झालेला आहे.हे मानवी जीवनात निर्माण होत असलेले भिषण संकट आहे.प्रेम,मानवता,बंधुत्व ,पारिवारीक आणि सामाजिक दायित्वाचा विसर पडून मनुष्य क्षणभंगूर आनंदाच्या शोधात आत्मकेंद्री होत चालला आहे.आपल्या अवती भवतीच्या गोतावळ्याचा,मानवी भावभावनांचा त्याला विसर पडला असून शोधाशोध करून सुख नावाचे लक्ष गवसत नसल्याने तो औदासिन्न्याच्या गर्तेत जाऊन समस्यांच्या चक्रव्यूहात जाऊन अडकलेला आहे.स्वत:घ्या मनाच्या क्षणाक्षणाला बदलणाऱ्या अवस्थांवर चिंतन करून षडरिपूंपासून दूर राहून स्वतःमध्ये वेळोवेळी बदल करत योग्य वाटचाल करण्याचं कसब आत्मसात करणारा माणूस जीवनात यशस्वी होऊ शकतो‌.म्हणूनच संतांनी ही सांगितलेले " *मन करारे प्रसन्न सकल* *सिध्दींचे कारण* ...! "
                                अमेरिकेत टेक्सास मधील शाळेत एका १८ वर्षाच्या शाळकरी मुलाने हाती बंदुक घेऊन अंधाधुंद बेछूट गोळीबार केला आणि आणि आपल्या सहकारी विद्यार्थ्यांना ठार मारले‌.माणूसकीच्या रस्त्यावरून वाट चुकल्याने भरकटून मानसिक विकृतीची शिकार झालेला तो मानसिक रूग्ण ठरला.....!अनेक मानसिक आघात मनस्वास्थ्य कोसळविणारे ठरतात. मुलांवर विशेषत: शाळांमधून बिघडलेल्या विकृत विद्यार्थ्यांकडून होणारे रॅगींगचे अत्त्याचार,सोबत अभ्यासाचा ताण, आणि या तणावपूर्ण विचारांच्या गर्दीत दुरदर्शन आणि सोशलमिडीयातून गुन्हेगारी दुनियेचे होणारे दर्शन, यातून निर्णयक्षमता गमावलेल्या विद्यार्थ्यी अनुचित दिशेने जातात.त्यांच्यावर कोणी अत्त्याचार केले असतील तर बदल्यांच्या,पेटलेल्या सुडाच्या भावनेने त्यांच्यातील क्रोध वावटळ वाऱ्याच्या गतीने पेट घेतो.मग बदला घेण्याच्या त्यासाठी बंदुक हाती घेण्याच्या आणि नानाविध प्रेरणा अपराधी दृश्यांतून झालेल्या असतातच.....!
                प्रत्येक शाळेमधून शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या समुहातील हालचालींवर सतत लक्ष ठेवले पाहिजे.पालकांनीही मुलांच्या वागण्या बोलण्यामध्ये होत असलेले बदलांचे अवलोकन केले पाहिजे.त्याचे समुपदेशन करून त्यांच्या मनाची मशागत झाली पाहिजे. जबाबदाऱ्या,कर्तव्ये,मानवी भावभावनांचे महत्व सांगून प्रेम,बंधुत्वाचे विधायक विचार त्यांच्या मनावर बिंबविण्याचे महत्व लक्षात घेतले पाहिजे.त्याच्या दिवसभरातील घटना समजून घेऊन त्याला विचारांचे नियंत्रण शिकविले तरच संभाव्य संकटांवर मात करता येईल.. कोणतीही परिस्थिती हाताबाहेर जाण्यापूर्वीच तिच्यावर उपयोजनांचे नियोजन करता येणे शक्य होईल. खाजगी शिकवणी वर्गातील लैंगीक अत्त्याचारांचे आघात सुध्दा मुला मुलींच्या मानसिक स्वास्थ्याला धक्का पोहचविणारे ठरू शकतात.त्यांची आयुष्ये उध्वस्त होऊ शकतात. 
युवावस्थेतील विद्यार्थ्यांना दुसरा कोणता आजार असला तर तो लवकर ठीक करता येईल. परंतू बिघडलेले विचार आणि आक्रमण केलेल्या विकृतीचे भिषण दुष्परिणाम त्याच्या परिवाराला आणि समाजालाही भोगावे लागतात.यामध्ये स्वत:चे असलेले जीवन हे त्यांच्या नियंत्रणात राहतच नाहीच....! त्यामुळे त्यांच्यावर स्वार झालेली हिंस्त्र वृत्ती,आक्रमकता ही समाजात काय विध्वंस घडवेल याची कल्पनाही करू शकत नाही. टेक्सास प्रमाणेच असाच रक्तरंजित इतिहास पाकिस्तानातील शाळेतही काही वर्षांपूर्वी घडलेला आहे. आपल्याकडे पुण्यातही अशाच विकृतीचे पिसाळलेल्या कर्मचाऱ्यांनी बेफाम एस.टी बस पळवून अनेक लोकांचे जीव धोक्यात घातल्याची उदाहरणे आहेत.
                               जीवनात मनासारखे न घडल्याने,कामाच्या अति ताणतणावामुळे,दुर्बल मन आणि सतत तेच ते विचार करण्याची सवय आणि त्यातून लागलेल्या नकारात्मक सवयींनी होणारी चिडचिड ,व्यसनाधिनता,अत्याचार आणि दडपशाही असे प्रसंग वाट्याला आल्याने मानसिक रूग्णांच्या संख्येमध्ये भरमसाठ वाढ होत आहे. अशा परिस्थितीत मनाची उत्तम मशागत करू शकणारे संस्कारांचे आदर्श व मानवी जीवनमुल्यांचे धडे आणि नैतिकतेचे मार्गदर्शन योग्य वेळेत न मिळू शकल्याने वैचारिक प्रदुषण टोकाच्या परिसिमेकडे प्रवास करीत आहे. त्याला आजचे मोबाईल,टीव्ही वरील अतिरंजीत गुन्हेगारी जगताचे दर्शन घडविणाऱ्या मालिका आणि स्वप्ननगरीच्या भ्रामक संकल्पनांमध्ये अडकवून ठेवणारी सोशल मिडीया कारणीभूत आहे.
                       विज्ञानयुगात मनुष्याला मिळालेल्या तांत्रिक उपहारांचा योग्य वापर केला तर ते जीवनाला प्रगतीच्या दिशेने घेऊन जाणारे वरदान ठरते.परंतू ते कसे आणि किती वापरावे या अज्ञानाने त्याचा अतिरेक होत गेला तर ते मानवी जीवनात विध्वंस घडविणारा शाप ठरू शकते.म्हणूनच मोबाईलचा उपयोग विधायकते साठी कमी आणि फसवाफसवी,विश्वासघात,लैंगिक चाळे आणि अश्लिलतेसोबतच उन्मादी कारनाम्यांसाठी जास्त केला जात आहे.त्यामुळे आर्थिक अपहार,फसवाफसवीची प्रेमप्रकरणे,आणि खून,दरोड्यांसारख्या महाभयंकर घटनांना चालना देणारी त्यांची जननी हे मोबाईल,दुरदर्शन आणि सोशलमिडीया आहे.हे अनेक परिनामातून समोर येऊन सिद्धही झालेलं आहे.सर्वाना हे लक्षात येतं आहे,समजते आहे,परंतू त्यावर विजय मिळवून नियंत्रण कसं ठेवावं हे मात्र उमजत नाही.
            ‌. पाश्चात्त देशात जे घडत आहे... टेक्सासमध्ये जे घडलं ते भारतात घडू शकतं नाही या भ्रमामध्ये राहण्यात अर्थ नाही.आपल्याकडेही अनेक परिवारांमध्ये पालकच स्वत: काय करीत आहेत...मानवी जीवनमुल्ये जोपासून नैतिक वाटचाल करीत आहेत काय, हे त्यांचे त्यांना समजून घेण्यासाठी वेळ नाही ते मुलांवर काय संस्कार करणार‌ ? मग आपली मुले मुली कुठे जातात,काय करतात याकडे लक्ष ठेवण्यासाठीच त्यांना वेळ नाही .नुकताच अकोल्यात एका खाजगी शिकवणी वर्गात मुलीचे जीवन असुरक्षित करणारा नराधमी विकृत एक वसिम चौधरी पुढे आला आहे.असे किती वसिम आणि टेक्सास सारखे मनोविकृतींनी पछाडलेले किती युवक कुठे कुठे दडलेले आहेत याची माहिती ह्या अशा घटना घडल्यानंतरच समोर येते.परंतू त्याच्या तपासण्या अगोदरच नेहमीसाठी एक कर्तव्य म्हणून स्विकारल्या,नेहमी लक्ष पहारेकरी म्हणूनच राहण्याचा संकल्प केला, तर समाजावरील संभाव्य आघातांवर नियंत्रण येऊन या परिस्थितीचे बळी करणा-यांना जीवनात हताश होण्याची वेळ निश्चितच येणार नाही. म्हणून वैचारिक प्रदुषण,समयसुचकतेचा अभाव आणि त्यातून वाढत्या विकृतींच्या आघात हे मानवी समाजावर घोंगावणाऱ्या संकटाला सावरण्यासाठी आत्मचिंतन करून पुढे आलं पाहिजे...नाही तर विनाश अटळ आहे.....!

    Post Views:  256


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व