राजकारण अडकले जातीय विळख्यात
शरद पवारांवर आक्षेपार्ह पोस्ट; अभिनेत्री केतकी चितळेवर गुन्हे दाखल
विश्वप्रभात न्यूज ब्युरो
14 May 2022, 8:45 PM
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याबाबत आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट लिहिल्याप्रकरणी वादग्रस्त अभिनेत्री केतकी चितळे हिला ठाणे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यानंतर केतकीविरोधात कळवा, ठाणे, बीड आदी ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच राज्यात अनेक भागात तिच्याविरोधात पोलिसात तक्रारही करण्यात आली आहे. केतकीवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून करण्यात येत होती तसेच केतकीवर कारवाई होणारच, असा इशाराही गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिला आहे.
केतकी चितळे ही आपल्या सोशल मीडियावरील वादग्रस्त पोस्टमुळे सतत चर्चेत असते. तिच्या पोस्टमध्ये नेहमी असभ्य भाषा आणि शिव्या पहायला मिळतात. अशा अनेक पोस्टमुळे ती अनेकदा चांगलीच ट्रोलदेखील झाली आहे, तसेच तिला अनेकांची टीकादेखील सहन करावी लागली आहे. आता तिने थेट राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते व अध्यक्ष शरद पवार यांना टार्गेट करत त्यांच्यावर असभ्य आणि अर्वाच्च शब्दात टीका केली आहे. तिने तिच्या पोस्टमध्ये एक काव्य लिहित अत्यंत खालच्या शब्दात शरद पवार यांच्यावर टीका केली आहे.
अॅडव्होकेट नितीन भावे नावाच्या व्यक्तीने लिहिलेली पोस्ट केतकी चितळेने शेअर केली होती. नुकतेच शरद पवारांनी जवाहर राठोड यांची कविता सादर केली होती. त्यावरून भाजपकडून टीका झाली होती. याच कवितेच्या अनुषंगाने केतकीने ही पोस्ट शेअर केली असावी. या पोस्टमध्ये शरद पवार यांच्यावर आक्षेपार्ह भाषेत टीका करण्यात आली आहे. केतकीने ही कविता शेअर केल्यानंतर राज्यभरातून संतापजनक प्रतिक्रिया उमटू लागल्या. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी कळवा, मुंबईसह इतर ठिकाणी केतकी विरोधात तक्रारी दाखल केल्यात.
केतकीविरुद्ध कळवा पोलिस ठाण्यात कलम 500, 505(2), 501 आणि 153 - अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. राष्ट्रवादीचे पदाधिकारी स्वप्निल नेटके यांनी हा गुन्हा दाखल केला आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी पुण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पुणे सायबर विभागाकडे तक्रारी दाखल केली.
तुका म्हणे पवारा । नको उडवू तोंडाचा फवारा ॥
ऐंशी झाले आता उरक । वाट पहातो नरक ॥
सगळे पडले उरले सुळे । सतरा वेळा लाळ गळे ॥
समर्थांचे काढतो माप । ते तर तुझ्या बापाचेही बाप ॥
ब्राह्मणांचा तुला मत्सर । कोणरे तू? तू तर मच्छर ॥
भरला तुझा पापघडा । गप! नाही तर होईल राडा ॥
खाऊन फुकटचं घबाड । वाकडं झालं तुझं थोबाड ॥
याला ओरबाड त्याला ओरबाड । तू तर लबाडांचा लबाड ॥
अशा स्वरुपाची शरद पवार यांची अत्यंत खालच्या शब्दांत निंदा करणारी व असभ्य भाषेचा वापर करण्यात आलेली कविता केतकी चितळे हिने पोस्ट केली आहे. सोबत या कवितेच्या खाली अॅडव्होकेट नितीन भावे असे ही कविता लिहिणार्याचे नाव लिहिले आहे.
ठेचून काढत नाही तोपर्यंत विषवल्ली वाढणारच : आव्हाड
पवार साहेबांवर अनेकवेळा टीका झाली. तेव्हा आम्ही बोललो. मात्र शरद पवार यांच्या आजाराबाबत, त्यांच्या शारीरिक स्थितीबाबत बोलणे आणि नरक मिळावा अशी प्रार्थना करणे, हे एका स्त्रीला शोभण्यासारखे नाही. स्त्री ही मातेसमान असते. पवारांबाबत जे भयंकर लिहिले आहे, ते शब्द तोंडातून निघतही नाहीत. असे का लिहावे वाटते हा संशोधनाचा विषय आहे. इतिहासात भगिनींनी छत्रपती शिवाजी महाराजांवरही टीका केली होती. आम्ही पहिल्याच फटक्यात गांभीर्याने घेत नाही. लोक मला सांगत आहेत की कशाला गांभीर्याने घेता. वयाच्या 83 व्या वर्षी मैदानात उतरणारा तुमचा बाप, त्याच्यावर चालून जाणारी विकृती कुणी असेल तर त्यांना रोखायला हवे. नाहीतर अशी वाढत जाणारी विषवल्ली जोपर्यंत ठेचून काढत नाही तोपर्यंत विषवल्ली वाढतच जाणार. त्यामुळे हे विष संपवले नाही तर ते समाजाला संपवून टाकेल, असा सूचक इशाराच जितेंद्र आव्हाड यांनी दिला आहे.
राष्ट्रवादीचा भाजप-संघावर निशाणा
राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा विद्या चव्हाण यांनी संघावर निशाणा साधला आहे. केतकी चितळे असेल किंवा शरद पवार यांना जीवे मारण्याबाबत ट्वीट करणारा भामरे असेल. यांना लहानपणी संघाच्या शाखेत जे विषारी
बाळकडू मिळाले त्याची उदाहरणे असल्याचे चव्हाण यांनी म्हटले. हे सगळे घडवून आणण्याचे काम विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून होत आहे. त्यांनी गावागावात 25-25 हजार रुपये पगार देऊन ट्रोलर्स नेमले आहेत. त्याच्या माध्यमातून अशाप्रकारे विष पसरवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप विद्या चव्हाण यांनी केला. राष्ट्रवादी युवती काँग्रेच्या प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर यांनीदेखील अभिनेत्री केतकी चितळेवर टीका केली. केतकी चितळे सारख्या विकृतींना संघाचे पाठबळ असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सातत्याने शरद पवार यांच्याविरोधात खालच्या पातळीवर टीका सुरू असल्याचा आरोप सुलक्षणा सलगर यांनी केला. मालिका दिग्दर्शक निर्मात्यांनी अशा विकृतींना थारा देता कामा नये अन्यथा आम्हाला वाहिनीवरील बहिष्कारासोबतच कार्यक्रमही उधळून लावावे लागतील, असा इशाराही सलगर यांनी दिला आहे.
तिने काय केले माहीत नाही : शरद पवार
आपण संबंधित व्यक्तीला ओळखत नाही आणि नेमके काय झाले ते प्रकरणही आपल्याला माहीत नाही, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले तसेच पवारांनी या प्रकरणावर अधिक भाष्य करणे टाळले आहे. हिंगोलीत पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
Post Views: 156