अकोला - कोणत्याही आपत्ती प्रसंगी स्वतःची सुरक्षा, तसेच बचाव करतांना आपत्तीत क्षतिग्रस्त झालेल्या इतरांना मदत करण्याचे धडे घेणे हे साऱ्यांसाठी आवश्यक आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी आज येथे केले.
राज्य आपत्ती व्यवस्थापन प्रतिसाद दल नागपूर यांच्या वतीने मान्सून पूर्व तयारीचा भाग म्हणून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन व प्रतिसाद दलाच्या विविध चमूंना आज पूरस्थितीतील मदत व बचाव कार्य याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. या प्रशिक्षण कार्यक्रमास जिल्हाधिकारी अरोरा यांच्यासह निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, तहसिलदार सुनिल पाटील तसेच प्रशिक्षक पोलीस उपनिरीक्षक अजय कालसर्पे उपस्थित होते. या प्रशिक्षणात जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन दलाचे तसेच मदत व बचाव पथकाचे सर्व सदस्य आपापल्या चमूसह उपस्थित होते.
आपत्ती व्यवस्थापनाचे तसेच मदत व बचावाचे प्रशिक्षण हे समाजातील प्रत्येक नागरिकाने घ्यावे. आपत्ती प्रवण गावांमध्ये जाऊन प्रत्येक ग्रामस्थाला याबाबत प्रशिक्षित करावे,असे आवाहन यावेळी जिल्हाधिकारी श्रीमती अरोरा यांनी केले. या प्रशिक्षणात पुरस्थितीत बचाव व क्षतिग्रस्तांना मदत करावयाची साधने, त्यांचा वापर, संकटात अडकलेल्या व्यक्तिंना सोडविण्यासाठी वापरावयाच्या विविध उपाययोजना, त्यासाठी स्थानिक पातळीवर उपलब्ध असलेल्या साहित्याचा वापर करणे, प्रथमोपचार करणे, जखमी नागरिकांची रुग्णालयापर्यंत सुखरुप ने आण करणे याबाबत सविस्तर प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन करण्यात आले.
येत्या दि.7 पर्यंत हे पथक अकोला जिल्ह्यात थांबणार असून दि.5 रोजी अकोट, दि.6 रोजी बाळापूर व दि.7 रोजी मुर्तिजापूर येथे जाईन ते प्रशिक्षण देणार आहेत. या प्रशिक्षणात स्थानिक तहसिलदार, नायब तहसिलदार, तलाठी, ग्रामसेवक, पोलीस. होमगार्ड, स्वयंसेवी संस्था प्रतिनिधी, शोध व बचाव कार्यात मदत करणारे स्वयंसेवक, पूर बाधीत गावातील सरपंच, पोलीस पाटील, पट्टीचे पोहणारे व्यक्ती, राष्ट्रीय सेवा योजना विद्यार्थी आदी सहभागी होणार आहेत.
Post Views: 178
सर्व
सर्व
admin@sanjay
admin@Sanjay