खामगावच्या उद्योगविकासाला ‘ग्रहण’! २५ वर्षांत एकही मोठा उद्योग नाही; मग जबाबदारी कोणाची?
उद्योग येत नाहीत, जुने उद्योग बंद पडत आहेत आणि तरुण रोजगारासाठी वणवण फिरत आहेत
विश्वाप्रभात न्यूज ब्युरो
15 Sep 2026, 1:26 PM
खामगाव : खामगाव परिसराच्या औद्योगिक विकासाचा गेल्या २५ वर्षांचा हिशोब आता जनतेने मागण्याची वेळ आली आहे. एवढ्या मोठ्या कालखंडात परिसरात एकही मोठा उद्योग आणण्यात यश आले नाही, ही बाब खामगावच्या भवितव्यावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे.
एकीकडे नवीन उद्योगांची प्रतीक्षा कायम आहे, तर दुसरीकडे सुरू असलेले अनेक उद्योग बंद पडले आहेत. जे काही उद्योग आजही कसाबसा तग धरून आहेत, त्यांच्यावरही संकटाचे सावट असल्याची चर्चा आहे.
मग पंचवीस वर्षे विकासाच्या घोषणा नेमक्या कुठे होत्या?
निवडणुकीच्या काळात रोजगार, उद्योग आणि विकासाचे आश्वासन दिले जाते; मात्र प्रत्यक्षात नवीन मोठी गुंतवणूक आणि रोजगारनिर्मिती कुठे आहे? हा प्रश्न आता खामगावच्या जनतेला पडला आहे.
खामगावमधील तरुणांकडे शिक्षण आहे, कौशल्य आहे, मेहनत करण्याची तयारी आहे; पण स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी कुठे आहेत?
तरुणाईचा संतप्त सवाल!
रोजगारासाठी खामगाव सोडून इतर शहरांकडे जाण्याची वेळ स्थानिक तरुणांवर का यावी?
उद्योग आणण्याची जबाबदारी कोणाची? बंद पडलेले उद्योग पुन्हा सुरू करण्यासाठी प्रयत्न कोण करणार? नवीन गुंतवणूक आणणार कोण? आणि खामगावच्या बेरोजगार तरुणांच्या हाताला काम देणार कोण?
आता आश्वासन नको, कृती हवी!
खामगावच्या जनतेला आता केवळ भाषणे, घोषणा आणि आश्वासनांपेक्षा ठोस औद्योगिक धोरण, नवीन उद्योग आणि स्थानिक रोजगार हवा आहे.
पंचवीस वर्षांचा काळ कमी नाही. या काळात जर परिसराच्या औद्योगिक विकासाला अपेक्षित दिशा मिळाली नसेल, तर त्याची राजकीय आणि प्रशासकीय जबाबदारी निश्चित करण्याची वेळ आली आहे.
खामगावचा सवाल थेट आहे —
“२५ वर्षांत एकही मोठा उद्योग का आला नाही?” “उद्योग बंद पडत असताना जबाबदार कोण?”
“आणि बेरोजगार तरुणांना रोजगार देणार कोण?”
आता जनतेला उत्तर हवे आहे...
आश्वासनांचे नाही, तर उद्योग आणि रोजगाराचे!
Post Views: 1