समाजशील भावना ....... आणि चिंतनशील कर्माने समाजधर्म सिध्द करणारे कर्मयोगी .... स्व.श्रीधररावजी देशमुख ...!


 विश्वप्रभात न्यूज ब्युरो  27 Jan 2023, 7:08 PM
   

जगी अनंत राजे झाले| परी सर्वचि नाही पूजिले| संत सज्जनची देव मानले|हृदय मंदिरी त्यांनी|
 राष्ट्रसंतांच्या या ग्रामगीतेतील सत्त्य विश्लेषणानुसार कर्तृत्ववान  सामाजिक पुरूषांचे निश्चित ते स्थान ठरविले जात असते.,सृष्टीच्या परिवर्तन चक्रात सामाजिक प्रक्रीयेतील स्थित्यंतरात अनेक व्यक्ती आजपर्यंत आल्या,आपापल्या कार्यांनी किर्तीवंत होऊन गेल्या.परंतू कोण,कुठे,किती यशस्वी ठरल्यात हे मुल्यमापण त्यांना जनसामान्यांनी अंतरंगात दिलेल्या स्थानावरून करणे हेच अनुमान जास्त वास्तव आणि अचूक ठरू शकते.अमुक एखादी व्यक्ती मोठी आहे, नामवंत आहे, म्हणजे कशी हे ठरविण्यासाठी तिचे कार्य जसे पाहिले जाते..... तशी तिच्या विचारांची पार्श्वभूमी, तत्वांची बैठक आणि आचरणाची अथांग खोली सुध्दा वर्षानुवर्षाच्या अनुभवांच्या परिसावर घासली जाते.मग तिची चकाकी पाहूनच तिला बावनकशी ठरविल्या जात असते. तशाच प्रकारचा निंबा परासरातील अनेकांच्या आयुष्यांना उजळविणारा बावनकशी परिसस्पर्श म्हणजे स्व. श्रीधररावजी देशमुख...!  जिल्हा,प्रदेश,राज्याच्या सिमा पार करून सर्वत्र आपली अलौकिक ओळख सिध्द करणारं....अनेक संदर्भ,निर्मिती आणि सिद्धहस्त नामवंत व्यक्तिमत्वांच्या कर्तृत्वामध्ये ज्यांच्या स्मृतींचा गंध दरवळतो असं अजरामर व्यक्तिमत्व म्हणजे आमचे सर्वांचे स्व.बापूसाहेब .... मालक ...! अनेकांच्या उध्दाराला आपल्या कर्तृत्वाच्या प्रकाशाने उजळवून सोडणारा देशमुख घराण्याचा कुलीन असा अविस्मरणीय वंशदिपक...! ज्यांचे जनशताब्दी वर्ष विविध उपक्रमांनी साजरे केले..आज शंभराव्या या जयंतीला त्यांच्या पावन स्मृतीला अंतरंगातील शहारलेल्या अनुभुतींच्या  प्रेमभावनांनी कृतज्ञतापूर्वक अभिवादन ...!  
               स्वश्रीधररावजी बाप्पूसाहेब उपाख्य मालक .... निंबा परिसरातील प्रकाश देऊन अस्तास गेलेला एक तारा हा लेख मी सन १९८४ - ८५ च्या  दरम्यांन वृत्तसंजीवनीत  मालकांच्या  एक खास कार्यगौरव विशेषांकात लिहला होता.त्यावेळी गावातून वृत्तसंजीवनी नावाचे साप्ताहिक वृत्तपत्र सुरू केले होते. त्यांच्या जीवनकार्याप्रती कृतज्ञता म्हणून हा विशेषांक त्यांच्या विकासयोजनांचा गौरव म्हणून त्यांच्या जन्म आणि कर्मभूमीतून समर्पित केला होता. त्यातील ते शिर्षक अजूनही मला जसेच्या तसे आठवते.त्यानंतर छोटं छोटं कधी लिहून स्मृतींना उजाळा देत आज जन्मशताब्दी स्मरणिकेच्या निमित्ताने त्यांच्या जीवनपटाकडे डोकावण्याचा योग आला. आम्हाला शाळेतील अक्षरं गिरवण्याच्या आणि त्यानंतर लिहिण्याच्या प्रेरणा निर्माण करण्यामागील खरे सुत्रधार म्हणजे शिक्षण आणि विकासमहर्षी  मालकच...! कारण ते नसते तर आज आम्ही कुठेच नसतो.शालेय जीवनात,आमच्या युवावस्थेतील त्यांच्यासोबतच्या नेहमीच्या संभाषणातील काही वाक्यं अजूनही आठवतात....तारुण्यसुलभ जीवनात आत्मविश्वासाने अनेकांना आश्वस्त करणारे,शाबासक्या  आणि कौतुकांनी अभिमानाच्या प्रेममिश्रित  भावनांनी इंचभर छाती फुगविणारे  त्यांचे ते मिश्कील  बोल आजही स्मरण देतात.... तू पुढे चल...अशक्य काहीच नाही.. शक्यतेचे दुसरे नावच महात्मा गांधी आहे ... *मजबूरीचे 
नाही* ....! समाजातील सर्व घटकांचा आणि खरा भौगोलिक विकास साधण्यासाठी नुसता शब्दांचा खेळ नको...कृती हवी..! त्या प्रयोगशीलतेचे शिल्पकार म्हणजेच स्व‌.श्रीधरराव देशमुख एवढे चिंतनातून त्यांना आठवल्यानंतर त्यांचा अनुभवलेला सहवास एका उत्तुंग दुर्मिळ व्यक्तिमत्वाची जीवनातील न भरून निघणारी पोकळी असल्याच्या जाणीवा आजही देतात...!
              निंबा येथून दै.नागपूर पत्रिकेपासून सन १९८३ साली माझ्या पत्रकारितेच्या जीवनाची सुरूवात झाली.त्यावेळी मी आपले एक काका म्हणून जवळून बघत राहिलो,अनुभवत राहण्याचे अनेक  योग सामाजिक वाटचालीतील एक साक्षीदार पत्रकार म्हणून मला येत राहिले. त्याकाळात त्यांचे कार्य आणि  स्थापित करून ठेवलेलं विकासाचं जाळं समजून घेण्याची समज आली होती.त्यांनी गावात आणलेल्या शिक्षणाच्या गंगेतच आपणही न्हाऊन साक्षर झालोत याची माहिती तर प्रत्येकाच्या मनात बालपणापासून कोरलेली होतीच.परंतू युवावस्थेचा जास्त समज येण्याचा आकलनाचा काळ, आणि त्या जोडीला पत्रकारिता आणि जनसंपर्क या दुर्लभ उपलब्धींमुळे त्यांचे जीवनकार्य जवळून पाहण्याचे,समजण्याचे प्रसंग घडत गेले.त्यांचे प्रगल्भ समाजशील विचार आणि  सत्संगी, उदात्त, सेवाव्रती व्यक्तिमत्व  संपर्कातून वेळोवेळी  अनुभवण्याचे योग जीवनात आले.परंतू ही शेवटची फार थोडी वर्ष माझ्या वाट्याला आलीत.ज्या काळात आम्ही कामाची काही विशेष सुरूवात केली नव्हती अशा काळात शाळा, बॅंक आणि कार्यक्रमाच्या निमित्ताने आलेले लोकप्रतिनिधी आणि अधिकारी वर्गासमोर आम्हाला मुद्दाम बोलवून परिचय करून देणे...आणि वरून सांगणे साहेब...पत्रकार आहेत पण आमचा मुलगा आहे बरं...! जेम तेम १८-१९ वर्षाच्या वयामध्ये एका महान सामाजिक सेवाव्रती आदरणीय  व्यक्तीकडून भावस्पर्शी आणि प्रेमयुक्त मोठेपण बहाल होणे ही गोष्ट कोणत्याही तरूणाच्या आयुष्यात किती सुखावह ठरत असेल याची नुसती कल्पनाच अंतरंगातील उचंबळून येणाऱ्या सुखावह प्रेमभावनांना स्पर्श करून जाते.वयाच्या ४ थ्या ५ व्या वर्षातील एक प्रसंग,आणि त्याची वडीलांचकडून अनेकवेळा झालेल्या उजळणी मुळे आठवतो.....ग्रा.पं च्या पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू होते.त्या कामासाठी बैलगाडी मागायला मालकांनी माणूस घरी पाठवला.वडील घरी नसतांनाही मी म्हटले घेऊन जा. नुसती या कमी वयात माझ्याकडून दिसलेली तयारी आणि निर्णयक्षमतेची कौतुकमिश्रीत प्रशस्तीपत्रं उदार आणि प्रेमळ अंत:करण असलेल्या मालकांकडून केवढ्या मोठ्या प्रमाणात मला मिळाली होती.हे माझ्या वडीलांकडून‌ मी नेहमी नेहमी ऐकत होतो. नावाचा,कामाचा बडेजाव... मोठेपण व अहंकार नावाचा षड्ररिपू ज्यांच्या आसपासही कधी फटकला नाही. असे गावातल्या.... परिसरातल्या लहान मुलांचेही कोमल हृदयी चाचा नेहरूच ते होते. झाले बहू होतीलही बहू परंतू मालकासम असणारे अनेकांच्या हृदयातील तेच  मालक .... तेच खरे जनतेच्या मनावर प्रेमाचे आधिराज्य गाजविणारे, त्यांना कार्यप्रवण करणारे समाजाचे चालकही होते ..!. 
                 आज  राजकारण हे समाजकारणाचे ढोंग वठवून ,भावनांचा बाजार भरवून अनैतिक मार्गाने स्वत:चे आर्थिक बस्तान बसविण्याचे हक्काचे क्षेत्र झालेले आहे. येथे शैक्षणिक पात्रता,वैचारिकता,सेवाभाव आणि सामाजिक बांधिलकीची गरज लागत नाही.अशा स्वार्थांध लोकप्रतिनिधींकडे अमर्याद सत्ता आणि अधिकार असूनही जे जनतेचे प्रश्न सोडवू शकत नाहीत.  त्यांच्यातील अमानविय दुष्प्रवृत्ती आणि असंवेदनशीलतेच्या कर्करोगाने सकारात्मक इच्छाशक्तीला मारून टाकलेलं असते.त्यामुळे समस्याग्रस्तांच्या वेदना सोडवण्यासाठी मानवतेच्या भावनेतून त्यांच्या हृदयाला कोणताही पाझर फुटत नाही.परंतू निंबा गावात एका सुखवस्तू श्रीमंत घराण्यामध्ये जन्माला आलेले स्व.श्रीधररावजी देशमुख ही ध्येयवेडी समाजशील व्यक्ती मात्र सुखासीन कुटूंबात आपले मजेत घालवता येईल असे अख्खे आयुष्य ग्रामविकासातून फक्त जनतेचे जीवनमान सुधारण्यासाठी घालवते.माणसा माणसामधला हृदयाला पिळवटून टाकणारा केवढा मोठा हा विरोधाभास....! या विरोधाभासातूनच  माणसा माणसा कधी होशील रे माणूस तू ही आर्त हाक नेहमी आमच्या लिखाणातून प्रतिबिंबित होत असते.
          त्यावेळीच्या जेमतेम हजार दोन हजार लोकवस्तीचं निंबा गाव ... ! जे आज श्रीधररावांचं निंबा म्हणून ओळखल्या जाते. आसपास विस खेडी सर्व निंबा गावाशी जोडलेली....ती विखुरल्या गेली असती. परंतू ती एकजीव होऊन आपसात प्रेमभावनांची क्षितीजंच जिथे लवकर गवसणार नाहीत ईतकी पक्की झालेली या परिसराची घट्ट नाती आहेत.कारण श्रीधरराव देशमुख नावाच्या सामाजिक गुरूंनी अनुग्रहीत केलेली ,मानवी जीवनमुल्ल्यांनी मंत्रांकीत झालेली या परिसरातील माणसं आहेत....! हा निंबा परिसर व त्यांना रेशमी बंधात एकत्र गुंफणारे किमयागार म्हणजे श्रीधरराव आणि श्रीधररावच ....!आज त्यांच्या शाळेतून उच्चशिक्षणाकडे जाऊन जीवनात यशस्वी झालेले उच्चपदस्थ अधिकारी,कर्मचारी,विविध क्षेत्रातील यशस्वी नामवंत आपल्या जीवनात सुखाची सावली निर्माण करणाऱ्या या कल्पवृक्षाला कधीच विसरलेले नाहीत.भरभरून मालकांच्या आठवणी काढतात...गहिवरून येतात. जनता जनार्दनाचे प्रेम आणि कृतज्ञतापूर्वक सदिच्छांची शिदोरी सोबत घेऊन अनंताच्या प्रवासाला निघून गेलेले हे  कृतार्थ दुर्मिळ व्यक्तिमत्व असावे या चिंतनाने ही हृदयाची उलथा पालथ होते. 
          स्वत:कडे लोकप्रतिनिधी होण्याच्या आमदार-खासदारांच्या उमेदवारीच्या  संधी म्हणून चालून आलेल्या दुर्मिळ प्रस्तावांना नाकारून शेवटपर्यंत फक्त समाजसेवक आणि जास्तीत जास्त लोकांच्या प्रेमाचा उपहार म्हणून मालक एवढीच  उपाधी स्विकारणारे हे   खऱ्या माणसाच्या परिभाषेतील एक आनंदी,यशस्वी,आत्मसंतुष्ठ पुरूष होते.. ....! काय म्हणावे या समाजसेवेच्या नशेला...  आणि गडगंज संपत्ती आणि मानतरातब प्राप्त होण्याच्या अशा संधी नाकारणाऱ्या स्वार्थी जगाच्या दृष्टीकोणाती या अव्यवहारी वेडेपणाला? म्हणूनच या समाजनिष्ठेची,जनसेवेच्या तपस्येची आणि गांधीवादाच्या उच्चत्तम जीवनमुल्यांची पक्की बैठक असलेल्या या समाजसाधक तपस्वी सेवकांची नुसती आमदार खासदार मंत्री,मुख्यमंत्रीच नव्हे तर इंदिराजींच्या दरबारातही एक कृतिशील नोंद होती. कॉग्रेस पक्षाचे एक निष्ठावंत सेवाव्रती श्रीधरराव बाप्पू हे अकोला जिल्ह्यातल्या निंबा गावात आहेत,आणि त्यांच्या कार्यकर्तृत्वाने आणि जनहृदयातील भावनांनी मंतरलेला परिसर म्हणजे ग्रामविकासाची साक्ष देणारा एक  ‌संघटीत भूभाग आहे. ही किर्ती सर्वत्र पसरलेली होती.म्हणूनच स्व.वसंतदादा पाटील मुख्यमंत्री असतांना त्यांच्या षष्ठब्दीपूर्ती समारोहाला तर माजी मुख्यमंत्री  स्व.ए.आर.अंतुले यांनी निंबा येथे हजेरी लावली होती.
        जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा याप्रमाणे मालक नुसते राजकारणी नव्हे तर समाजसाधक व कनवाळू साधूही होते.कारण साधुत्वाचेच त्यांचे आचरण होते.भक्तीरसात स्नान करणारे श्रद्धावान होते,परंतू डोळसपणाने कर्मसाधना करणारे विज्ञानवादीही तेवढेच होते.राजकारण्यांच्या कोंढाळ्यात राहणारे परंतू नियमित तुकाराम गाथेचं वाचन करणारे आणि गळ्यात विना अडकवून लयबध्द अभंग म्हणणारे ते पंढरीचे वारकरीही होते.या अष्टपैलू गुणवंत व्यक्तिमत्वामध्ये कोणती उणीव कधी आढळली नाही.ते कलारसिक होते, साहित्यामध्ये रूची जोपासणारे अभिरूची संपन्न वाचक होते....साहित्य रसिक होते.
         कोणतेही उत्तम साहित्य हे अंतरंग,चिंतन,भावना आणि जीवनातील अनुभवांचा समृध्द आविष्कार असतो.त्याने आनंदाच्या प्रवाहाची गती वाढून त्यातील चिंतनशिलनेच प्रेरणा जागृत होतात, अनेक कलाकृती जन्म घेत असतात.मग त्या नुसत्या साहित्यातील असाव्यात याची आवश्यकता नाही. त्या चिंतन आणि अभ्यासातून प्रज्ञा जागृत होऊन व्यापक सामाजिक आविष्कार सुध्दा घडत असतात. मालक हे अध्यात्मवादी सत्त्संगी होते, मानवी जीवनमुल्ल्यांचे तर कठोर साधक होतेच. शिक्षण, सामाजिक, सहकार, शेती, उद्योग याहीपलिकडे जाऊन कला आणि मनोरंजन क्षेत्रातील त्यांच्या रसिकतेने अनेक दिग्गज कलाकार निंबा गावाच्या भूमीत आपल्या पदस्पर्शाच्या आठवणी जीवंत ठेऊन गेले. सुरवातीला आपल्या विकासकार्याच्या टप्प्यात परिसरातील जनतेला दळणवळणाची साधने सुलभ व्हावी म्हणून निंबा गावाला जोडणारे परिसराचे रस्ते,शाळा,कनिष्ठ महाविद्यालय,युको राष्ट्रीयकृत व जिल्हा मध्यवर्ती बॅंक,मागासवर्गीय मुला मुलींचे वस्तीगृह,टेलिफोन व्यवस्था,पाणीपुरवठा,सब पोस्ट ऑफीस,विश्राम गृह,आदी अनेक सुविधा आणि नव्या नव्या विकासाच्या आणि शेती विषयक योजना,रोजगार आदी सर्व विकास ही मालकांचीच तपस्या होती.कोणतीही योजना हातात घेतल्यानंतर ते परिसरातील प्रमुख लोकांशी चर्चा करून तिची रूपरेषा ठरवित.त्यातून  मिळणारा जनसहयोग आणि प्रसंगी स्वतःची पदरमोड करून ती योजना तडीस नेईपर्यंत स्वस्थ बसत नव्हते.येणारे लोकप्रतिनिधी,अधिकारी यांचे आदर आतिथ्य एवढ्या मोठ्या प्रमाणात मालकांकडे होत असे की बाप्पूंचा तो स्नेहपूर्वक आग्रह तृप्तीचा आनंद देणारा कसा होता,याच्या स्मरणपूर्वक साक्ष आजही अनेक अधिकारी आणि नेते आम्हाला पटवून देत राहतात.
                 शिक्षण,सामाजिक,सहकार ,कला क्रिडा,संगीत,अध्यात्म,प्रबोधन,या सर्व क्षेत्रांमध्ये आवड जोपासून प्रत्येक ठीकाणी आपला कार्याचा ठसा उमटविणारे वारकरी संप्रदायी स्व.श्रीधरराव बाप्पू म्हणजे एक रसिक आणि अष्टपैलू व्यक्तिमत्व होते.जीवनातील अनुभव,कुटूंबातील वैचारिक वारसा आणि अध्यत्मिक पिंड घेऊन जन्माला आलेले ते कर्तृत्वसंपन्न कर्मयोगी होते.गावात सतत नामसंकिर्तन सुरू रहावे,समाजाला सत्संग सदाचार घडावा यासाठी अनेक भागवत कार,किर्तनकार,प्रवचनकार मालकांच्या निमंत्रणावरून गावात मोठ्या आनंदाने येत.येथील अनोखा आनंद,सदाचार आणि आलेल्या अनुभवांची शिदोरी घेऊन त्यांचे वर्णन ईतर गावात करीत असत.पाहूणे म्हणून आलेले अधिकारी, अध्यात्मसाधक, कलाकार, आप्तस्वकीय पाहुण्यांचे आदराथित्याचे सगळे मराठमोळे आणि वऱ्हाडी सोपस्कार आणि आग्रहाने दिली जाणारी पंचपक्वान्नांची मेजवानी म्हणजे अजूनही जीवंत आठवणी आहेत.एवढ्या ५०-६० वर्षानंतरही त्यांच्या घरी येऊन गेलेल्या व्यक्ती अजूनही आमच्यासमोर हा उल्लेख विस्ताराने करतात...आपण त्या निंब्याचेच का म्हणून त्यांच्या विचारण्यातील आपुलकी अनेकवेळा  निदर्शनास येते.
कोणते  सामाजिक नेते कसे होते यांच्या स्मृती लोकांच्या हृदयातून अनेक भावस्पर्शी संभाषणातून झिरपत राहिल्या पाहिजे तरच त्यांचं खरे मोठेपण आणि आदर्शाचा हा सुगंध दरवळत राहील.कर्तृवाच्या यशामागील सत्त्य नव्या पिढीला प्रेरणेचे धडे देत राहील.यातूनच ते खरोखरच सामाजासाठी जगलेले,सर्वांना आपलंसं करून मानवतेचे सत्त्यांश आपल्या आचार विचार आणि कृतीतून व्यक्त करणारे समाजपूरूष होते याचा प्रत्यय अनेक वर्ष येत राहतो.यासाठी आजच्या काळात आपलं खोटं मोठेपण दर्शविण्यासाठी मिडीयाला हाताशी धरणारे कींवा भाटगीरी करणाऱ्या भाडोत्री नशा वापरण्याची स्व.श्रीधरराव देशमुखांसारख्या समाजसेवकांना त्याकाळात कधीच गरज पडली नाही.कारण कर्मच बोलकं होतं.म्हणूनच सामाजिक भावना आणि विधायक विचारांची समाज,प्रशासनातील अधिकारी आणि लोकप्रतिनिधींवर पडलेली छाप चिरंतन राहिली.म्हणून त्यांची नाविण्यपूर्ण वाटचाल अनेकांच्या हृदयात कोरली गेली.ती आजही भेटी गाठीच्या प्रासंगीक समयी शब्दरूपाने सतत ईतरांकडूनच बाहेर पडताना दिसत असते.
         त्यांच्या प्रेमळ,विनोदी स्वभावाचं, सहजता, प्रसंगावधानता,हजरजबाबीपणा आणि कोणाकडूनही सामाजिक काम करून घेण्याच्या विलक्षण हातोटीचं ह्या त्यांना अनुभवलेल्या व्यक्ती सतत वर्णन करीत राहतात .हे त्यांच्या जीवनकार्याची परिपूर्णत्वाची, साक्षित्वाने बहाल होणारी प्रमाणपत्रे म्हणावी लागतील. विनम्रता वाचन,चिंतनाने आणि माणसे तपासण्याच्या  बुध्दीच्या सरावातील प्रयोगशाळेतून अनेक व्यक्तिमत्वाचा अभ्यास हा त्यांच्या जीवनातील शोधप्रबंध होता.म्हणून ते आचार्यही  होतेच सामाजिक विचारधन आणि मानवी जीवनमुल्ल्यांचे चालते बोलते सिध्द विद्यापीठ होते.प्रत्येक माणसाच्या हृदयात शिरून त्याच्यातील सामाजिकता,मानवता कशी जागवावी याचं कसब हस्तगत केलेले ते कीमयागार होते.जनसंपर्काच्या यात्रेतील ते सामाजिक सेवादुत होते. सामाजिक उध्दाराची स्वप्ने आणि समाजाशी एकरूप होऊन  जखमांच्या वेदना समजून घेऊन त्यांना शमविण्यासाठी तळमळीच्या अशा कनवाळू निष्णात डॉक्टरांची या समाजाला खरी आवश्यकता असते.तरच वेदना ग्रस्त जनतेला आपला खरा तारणहार मिळाल्याचा आनंद होतो. समाजाची दु:खं समजून न घेता समाजाला पोखरणारे अर्धे अधिक जंतू हे कर्म आणि विचारात असतात..ही वास्तवता ओळखून हृदय आणि विचारांची अंर्त:बाह्य स्वच्छता करून कर्माला योग्य दिशा द्या म्हणणारे बिना डीग्रीचे गाडगेबाबा आणि अर्धशिक्षित राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे विचारच समाजाला तारू शकतात हे आज सिध्द झालेलं आहे.त्या मार्गानेच आपल्या आयुष्यभरातील समाजकार्याला दिशा देऊन गांधीवादी विचारांचे मालक आपल्या विचार,कर्तृत्व आणि सफल सामाजिक प्रवासाने आजही अजरामर आहेत...! हृदय,विचार आणि चिंतनशील कर्माने खरा समाजधर्म जागविणारे आणि कृतीतून जगणारे ते समाजशील कर्मयोगी होते...! असे पुरूष अनंत वर्षांनी जन्माला येत असतात.आपल्या आचार,विचार आणि कर्तृत्वाच्या खूणगाठा येथे कायम ठेऊन त्यापासून येणाऱ्या पिढीने प्रेरणा घेऊन पुढे सामाजिक वारसा चालवावा ह्या सुप्त अपेक्षा मागे ठेऊनच ते येथून जात असतात.फक्त देहरूपाने, कर्माच्या साक्षित्वाने मात्र अजरामर असतात...समाजातील युवाशक्ती ही समाजाची पर्यायाने राष्ट्राची आधारस्तंभ आहे.त्यांनी अशा आदर्शांना अनुसरून आपली वाटचाल निश्चित आता प्रशस्त केली पाहिजे.तरच अशा कर्तृत्ववादी पुरूषांच्या जीवनकार्याचा मन:स्वी गौरव आणि त्यांना तिचं खरी श्रध्दांजली ठरेल. सामाजिक गरजा लक्षात घेऊन मालकांच्या वाटचालीचे नुसते सिंहावलोकन जरी केले तरीही त्या  स्मृती प्रेरणा देत राहतील.फक्त त्या आदर्शांना जीवंत ठेऊन मानवता आणि समाजशीलतेच्या या मानवतेच्या या सामाजिक मंदिरावर कळस कसा, केव्हा चढवावा यांचे चिंतन करून युवा पिढीने सक्रिय होत राहणे आवश्यक आहे....काळाची गरज आहे....! तो कुणासाठी थांबत नसतो..... थांबला नाही....थांबणारही नाही...हे सत्य ओळखता आले पाहिजे.....! सामाजिक प्रेरणेचा हा प्रवाह दुथळी भरून  अखंड वाहत राहिला पाहिजे...! तरच समस्याविरहीत आनंदी जीवनाचे  उपहार आपल्याच समाजबांधवांना आणि भावी सहज मिळत राहतील.प्रगतीच्या चांगल्या परिणामांची भावी पिढीलाही मिळत राहतील,अशी ही मानवी शृंखला आहे...!
स्व‌.श्रीधररावजी बाप्पूसाहेब ... या कनवाळू समाज सेवाव्रती कर्मयोग्यांना त्रिवार अभिवादन मानवतेचा मानाचा मुजरा ...!
संजय माणिकराव देशमुख ( निंबेकर )
 संस्थापक - राष्ट्रीय अध्यक्ष -- लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ, अकोला 
 राष्ट्रीय कार्यकारिणी पदाधिकारी - इंडीयन ग्वेज न्यूजपेपर्स असोसिएशन ( ईलना ), दिल्ली 

    Post Views:  128


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व