पुणे- मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची उद्या औरंगाबाद येथे जाहीर सभा होणार आहे. तत्पूर्वी आज ते त्यांच्या पुण्यातील राहत्या घरून औरंगाबादच्या दिशेने रवाना होणार आहेत. त्यामुळे राज ठाकरे यांच्या पुण्यातील निवासस्थानाबाहेर मनसेचे पुणे आणि मुंबईतील कार्यकर्ते, पदाधिकारी जातीने हजर आहेत. परंतु या सर्वांमध्ये एका व्यक्तीची मात्र कमी जाणवते. ते म्हणजे मनसेचे माजी पुणे शहराध्यक्ष वसंत मोरे. राज ठाकरे यांचं जेव्हा शुक्रवारी पुण्यात आगमन झालं तेव्हा पुण्यातील सर्व पदाधिकारी त्यांच्या स्वागताला उपस्थित होते. परंतु वसंत मोरे मात्र गैरहजर होते. त्यानंतर आज सकाळपासूनच राज ठाकरे यांच्या पुण्यातील घराबाहेर मोठ्या संख्येने मनसैनिक आणि पदाधिकारी जमले आहेत. मात्र वसंत मोरे गैरहजर आहेत. राज ठाकरे यांच्या पुण्यातील प्रत्येक कार्यक्रमात आवर्जून हजेरी लावणाऱ्या, पुढाकार घेणारे वसंत मोरे गैरहजर असल्याने त्यांनी मनसे सोडली की काय असा प्रश्न अनेकांच्या मनात उपस्थित होतोय.
राज ठाकरे यांनी गुढीपाडव्या निमित्त आयोजित करण्यात आलेल्या पक्षाच्या मेळाव्यात मशिदीवरील भोंगे यासंदर्भात जी भूमिका घेतली होती त्यानंतर वसंत मोरे काहीसे नाराज झाले होते. त्यांनी आपली नाराजी बोलून दाखवताना माझ्या प्रभागात मशिदीसमोर भोंगे लावणार नाही असं देखील जाहीर केलं होतं. तेव्हा वसंत मोरेंच्या या भूमिकेची जोरदार चर्चा झाली होती. वसंत मोरे यांच्या या भूमिकेनंतर अनेक मनसैनिकांनी राज ठाकरेंच्या भूमिकेविषयी विरोधात नाराजी व्यक्त केली होती. तर काही मनसैनिकांनी राजीनामे देखील दिले होते. पक्षात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली होती.
त्यानंतर अचानक वसंत मोरे यांची पुणे शहर अध्यक्ष पदावरून उचलबांगडी करण्यात आली होती. तर त्यांचीच सहकारी असलेले साईनाथ बाबर यांच्यावर पुणे शहरअध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली होती. कुठलीही पूर्वकल्पना न देता अचानक हाकालपट्टी झाल्याने वसंत मोरे काहीसे नाराज झाले होते. दरम्यान याच कालावधीत इतर काही राजकीय पक्षाकडून वसंत मोरे यांना पक्ष प्रवेशाच्या ऑफर आल्या होत्या. परंतु वसंत मोरे यांनी राज ठाकरे यांची भेट घेत आपण पक्ष सोडणार नसल्याचे सांगितले होते.
परंतु त्यानंतर पुण्यात झालेल्या या कार्यक्रमात वसंत मोरे यांची हजेरी कमी झाली. आज राज ठाकरे औरंगाबादच्या दिशेने अवघ्या काही वेळात रवाना होणार आहेत. त्यांच्यासोबत जाण्यासाठी अनेक माणसांनी आणि पदाधिकारी उपस्थित आहेत. मात्र या ठिकाणी वसंत मोरे यांची अनुपस्थिती प्रकर्षांने जाणवते. त्यामुळे वसंत मोरे यांनी मनसेला रामराम तर केला नाही ना असा प्रश्न सर्वांना पडला.
Post Views: 207
सर्व
सर्व
admin@sanjay
admin@Sanjay