लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाची वाशिम जिल्हा आढावा बैठक उत्साहात संपन्न;
नव्यांना ओळखपत्र वाटप, विविध विषयांवर मंथन
विश्वाप्रभात न्यूज ब्युरो
24 Sep 2026, 11:18 AM
वाशिम | प्रतिनिधी : लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या वतीने वाशिम येथे जिल्हा पत्रकार आढावा बैठक मोठ्या उत्साहात आणि खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. जिल्ह्यातील पत्रकारांच्या विविध समस्या, पत्रकार संरक्षण कायदा, हक्कांचे संरक्षण आणि आगामी संघटनात्मक नियोजन यावर या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.
मान्यवरांची उपस्थिती व स्वागत
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. संजयजी (एस.एम.) देशमुख साहेब होते. प्रमुख उपस्थिती म्हणून राष्ट्रीय पदाधिकारी तथा कादंबरीकार मा. पुष्पराज गावंडे, मा. अनिल इंगळे, मोहोड साहेब, विभागीय संघटक प्रमुख विदर्भ देवानंद वाळके, मराठवाडा संघटक प्रमुख शंकरराव सांगळे आदी उपस्थित होते.
या बैठकीचे स्वागताध्यक्ष म्हणून अॅड. अर्जुन रेंगे आणि रमेश समुद्रे यांनी जबाबदारी सांभाळली. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रसंत गाडगेबाबा आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना वंदन करून करण्यात आली.
शहीद जवान, बळीराजा आणि दिवंगत पत्रकारांना श्रद्धांजली
कार्यक्रमाच्या सुरुवातीला देशासाठी बलिदान दिलेल्या शहीद जवान, पेपरफुटी प्रकरणातील युवा विद्यार्थी, अत्याचारग्रस्त महिला, आत्महत्याग्रस्त शेतकरी, दिवंगत पत्रकार तथा विविध आपत्तीत बळी गेलेल्या नागरिकांना सामूहिक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
नवीन सभासदांना ओळखपत्रांचे वाटप
बैठकीदरम्यान महासंघात नव्याने प्रवेश केलेल्या सभासदांना अधिकृत ओळखपत्रांचे (ID Card) वाटप राष्ट्रीय अध्यक्ष संजय देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. हे ओळखपत्र केवळ ओळख नसून संघटित पत्रकार शक्तीची आणि सामाजिक जबाबदारीची ओळख असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
राष्ट्रीय अध्यक्षांच्या कार्याचा गौरव
राष्ट्रीय अध्यक्ष संजयजी देशमुख साहेब यांच्या कार्यपद्धतीचे यावेळी सर्वांनी कौतुक केले. "प्रश्न कोणताही असो, वेळ कोणतीही असो - पत्रकारांच्या अडचणीत सर्वात आधी धावून जाणारे नेतृत्व म्हणजे एस.एम. देशमुख साहेब" अशा भावना पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केल्या.
बैठकीत करण धोंगडे, लकी रोकडे, विनोद भालेराव, प्रदीप सावले, भीमराव वाळके, पंजाबराव वट यांच्यासह उपस्थित पत्रकारांनी पत्रकारांच्या प्रश्नांवर परखड सूचना मांडल्या.
संघटित लढ्याचा निर्धार
"एकट्याची लेखणी आवाज उठवू शकते, मात्र संघटित पत्रकारांची लेखणी बदल घडवू शकते" असा एकमुखी निर्धार यावेळी करण्यात आला. पत्रकार संरक्षण कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आणि पत्रकारांच्या न्याय्य हक्कांसाठी संघटित लढा उभारण्याचा निर्णय घेण्यात आला.
कार्यक्रमाचे संचालन पंजाबराव वट यांनी केले, तर आभार प्रदर्शन जिल्हा प्रतिनिधी प्रताप नागरे यांनी मानले.
यावेळी लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ अकोला जिल्ह्यासह वाशिम जिल्ह्यातील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Post Views: 6