हायवे अंडरपास जवळ ट्रक फसल्याने पातुर मार्गावरील ट्राफिक जाम


स्कूल बस अडकल्याने प्रभात डे-बोर्डिंगच्या विद्यार्थ्यांना द्यावी लागली सुटी
 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  16 Jul 2022, 11:00 AM
   

अकोला- पातुर मार्गाला ओव्हर क्रॉस करून जाणाऱ्या महामार्गाच्या अंडरपास जवळ शनिवारी सकाळी एक मोठा 12 चाकी ट्रक फसल्याने या मार्गावरील ट्राफिक बराच वेळ पर्यंत जाम झाली होती. पातुर कडे जाणाऱ्या व येणाऱ्या या ट्राफिक जाम मध्ये प्रभात डे-बोर्डिंग सह पातुर वरून अकोल्यात येणाऱ्या काही विद्यार्थ्यांच्या बसेस अडकल्या होत्या. त्यामुळे प्रभात डे बोर्डिंगच्या पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना सुट्टी द्यावी लागली.

      गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे अनेक रस्ते खचले आहेत. बऱ्याच ठिकाणी चिखल निर्माण होऊन वाहने फसत आहेत तर कुठे घसरून पडत आहेत. शनिवारी सकाळी सुद्धा अशीच एक घटना पातुर मार्गाला ओव्हरक्रॉस करून जाणाऱ्या हायवेच्या अंडरपास जवळ घडली. सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास या अंडरपास जवळ एक मोठा 12 चाकी ट्रक चिखलात फसला होता. त्यामुळे अंडर पास मधून जाणारी व येणारी दोन्ही बाजूची वाहतूक जाम झाली. अंडरपासच्या दोन्ही बाजूने वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या. प्रवासी वाहनांसह मालवाहू वाहने सुद्धा जवळपास तीन तास अडकली होती. यामध्ये पातुर मार्गावर असलेल्या प्रभात डे-बोर्डिंगच्या स्कूल बसेस सुद्धा अडकल्याने ह्या बसेस विद्यार्थ्यांना घेण्यासाठी शहरात पोहोचू शकल्या नाहीत. परिणामी प्रभात डे-बोर्डिंगच्या पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना सुट्टी द्यावी लागली. काही वेळाने या अंडरपास जवळ निर्माण झालेल्या चिखलात मुरूम टाकून बाजूने तात्पुरता पर्यायी मार्ग काढून वाहतूक सुरळीत करण्यात आली.

      या मार्गाचे काम अनेक महिन्यांपासून सुरू आहे. पावसाळा सुरू होण्यापूर्वी अंडरपास जवळील धोकादायक मार्ग मजबूत करणे आवश्यक होते. परंतु अकोला  जिल्ह्यातील रस्ते निर्माण कार्यावर कुणाचेही नियंत्रण नाही, कुणाचाही वचक नाही. कंत्राटदारांनी अगदी मनमानी पद्धतीने त्यांना वाटेल तसे काम करावे आणि नागरिकांना जेवढा देता येईल तेवढा त्रास द्यावा, ही रस्ते निर्माणाची परंपरा गेल्या आठ-दहा वर्षांपासून अकोला जिल्ह्यात सुरू आहे. यावर अकोल्यातील नेताजीही काही बोलत नाहीत आणि लोकही काही बोलत नाहीत. प्रशासनाला तर काही घेणेदेणेच नाही. आज फक्त एक ट्रक फसल्याने या मार्गावर एवढी मोठी बिकट परिस्थिती निर्माण झाली. भविष्यात एखादी दुर्घटना घडली तर त्याला जबाबदार कोण राहील? असा संतप्त प्रश्न आता नागरिक व विद्यार्थ्यांचे पालक विचारायला लागले आहेत?
      शहरातील उड्डाण पुलाचे श्रेय घेऊन स्वतःचा उदो उदो करणाऱ्या नेताजींना ज्या महामार्गासाठी हा उड्डाणपूल बांधण्यात आला, त्या महामार्गाच्या अत्यंत दयनीय परिस्थितीकडे लक्ष देण्यासाठी वेळ का नसावा? असे प्रश्नही उपस्थित व्हायला लागले आहेत.

    Post Views:  278


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व