उपटसुंभ नेते आणि डोक्याला ताप देणाऱ्या दलांलाविरूध्द उठाव झाला पाहिजे...!
लोकशाही शासनव्यवस्थेत शासकीय तिजोरीत जमा केलेल्या जनतेच्या पैशांचे आणि पोलिस खात्यासह अनेक सरकारी यंत्रणांचे फायदे जनतेला कमी, आणि राजकीय नेत्यांनाच जास्त होतांना दिसत आहेत.ह्या साऱ्या यंत्रणा उपटसूंभ राजकारण्यांच्या दिमतीला फार मोठ्या प्रमाणात जुंपलेल्या आहेत.एकदा आमदार खासदार झाला की आयुष्यभर पेन्शन, शासनात असतांनाच मिळालेले सरकारी लाभ...! म्हणजे आंधळे बिचारे दळतच दळत राहतात..... आणि पीठ खाणारे भ्रष्ट मार्गाने आपल्या पुढील पिढ्यांची सुरक्षित सोय करीत मज्जाच मज्जा करतात. हा या लोकशाहीतील देशाचा फार मोठा दैवदुर्विलास आहे..! या देशात आणि भाजपची सत्ता नसलेल्या राज्यात राज्यात अमाप पैसा खर्च करून चालविल्या जाणाऱ्या पोलिस यंत्रणा ह्या आजकाल उन्मादी टीका टीपणी करणाऱ्या रिकामचोट उद्योग करणारांच्या संरक्षणात लावल्या जात आहेत. ईडी,सीबीआय आणि रात्रीस खेळ चालविणाऱ्या स्वायत्त संस्था फक्त खोटारडया लोकांच्या सेवेत त्यांच्या दिमतीला आहेत.अशा अंधेरनगरीतल्या चौपट राजाचे हे अन्याय्य राज्य आहे असे खेदाने म्हणावे लागते.
शासकीय यंत्रणांच्या डोक्याचा ताप वाढवून निर्लज्जपणे जनतेच्या पैशांचा चुराडा करण्याचे अनैतिक उद्योग करणाऱ्या मंडळींच्या फौजा इथे तयार होत आहेत. श्रीमंत बापाचं घरातील वाया गेलेलं एखादं कारटं वडीलांच्या हरामाच्या पैशांवर मित्रांचा गोतावळा जोपासून कुकर्माने घरातील संपत्तीचा लिलाव करतो.त्याचप्रमाणे हे काही बहूसंख्य अर्धवट शिक्षित,भ्रष्टाचारी,अनाचारी,व्यभिचारी आणि गुन्हे दाखल गुंड म्हणजे आयत्या बिळात फणे काढून बसलेले लूटारू नागोबा आहेत.यांना सामाजिक बांधिलकी म्हणजे काय? सेवेची घेतलेली शपथ म्हणजे काय? निवडून दिलेल्या मतांचे मुल्य काय? जनतेच्या भावनांशी निष्ठा राखून कर्तव्यभावनेने विकास आणि केली जाणारी सेवा म्हणजे काय? यातल्या एकाही प्रश्नाचं उत्तर समजून घेण्याची तयारी नाही.कारण ते संस्कार आणि मानवी जीवनमुल्ल्यांच्या अभ्यासाशिवाय पास झालेले, किंवा किमान वरपासाचा बुध्द्यांक बाळगणारे विद्यार्थी आहेत. त्यामुळे हे असे काही समजून घेण्याची कोणतीही गरज त्यांना कधी वाटली नाही आणि वाटतही नाही....मायबाप नावाची जनता हाडांची काडे करून सरकारी तिजोरीत पैसा देते. हे प्रेताच्याही टाळूवरील लोणी खाणारे समाजप्रतारक कृतघ्न मात्र स्वत:च्या मौजमजेसाठी आणि डोक्याला ताप देणाऱ्या उपद्व्यापसाठी त्या तिजोरीची विल्हेवाट लावत राहतात. बिघडलेल्या एका नालायक मुलाला संपत्तीचा काही वाटा देऊन तरी हाकलून देण्याचा बंदोबस्त केला जाईल.परंतू वर्षानुवर्षे कुकर्म करीत निर्लज्जपणे सरकारी भांडारं आपल्या पित्याची मालमत्ता असल्यागत वापरत सतत अनाचारच करीत राहणाऱ्या या देशातील या अशा गटात मोडणाऱ्या असंख्य निर्लज्जांचं आता काय करावं? हा येथील जनतेसाठी सहजासहजी न सोडवता येणारा आणि डोकेदूखी ठरलेला चिंतनिय जटील प्रश्न ठरलेला आहे.
बळी तो कान पिळी....ज्याच्या हातात फासा तो पारधी.... या म्हणीमधील सत्यांश वर्तमान परिस्थितीत चपलखपणे समोर येत आहेत.कारण आमच्या महाराष्ट्रात आणि इतर भाजप विरहीत राज्यात भ्रष्टाचारी,अनाचारी आणि गुन्हेगार हे फक्त एक भाजप पक्ष सोडून इतर पक्षांमध्येच जास्त दिसत आहेत .म्हणून जागतिक पातळीवर भ्रष्टाचारविरहीत नैतिक, स्वच्छ,आणि धुतल्या तांदळासारखा चारित्र्यसंपन्न पक्ष म्हटल्या जावा.म्हणून त्यांना याबध्दल एका प्रशस्तीपत्राव्दारे सन्मान प्राप्तीचे अच्छे दिन येण्याचा स्वप्नसंकल्प करण्यास कुणाची काही हरकत नसावी.कारण "जगद्गुरू" ही उपाधी फक्त उच्च कोटीच्या विभूती आणि शंकराचार्यांसाठीच राखिव असल्याने सध्या मोदींना काही श्रध्दाळू भक्तांनी विश्वगुरू ही पदवी दिलेली आहेच.परंतू ती व्यक्ती पुजा झाली. म्हणून त्याहीपलिकडील पक्षपुजेच्याही आरत्या ओवाळून घेण्यासाठी काहीतरी प्रयत्न झाले पाहिजे.कामविना फुकटचा श्रेय वाद आणि सन्मान नाकारणारे बोटावर मोजण्याइतकेच शिल्लक आहेत.त्यामुळे देशातून ते जमणे कठीण असेल तर त्यासाठी जागतिक स्तरावरूनच अशी वातावरणनिर्मिती करण्याचे प्रयत्न झाले पाहिजेत.कारण ज्या गावात पिकते त्या गावात ते खपत नसते, याचा येथील शेतकऱ्यांनाही भरपूर अनुभव देण्याचे काम आता झालेले आहे.म्हणून या अनुभवातून शहाणपण घेऊन बाहेरून आणलेला एखादा सन्मान जबरदस्तीने देशवासियांच्या गळी मारता येईल.शेवटी संमोहनाच्या नियमानुसार जादुगाराने हळूहळू वादी किंवा दोरी म्हणून टाकलेले वस्तूही सापच दिसायला लागणार हे एक सत्त्य आहेच...आणि कालांतराने त्यावर सत्याचे ची लेबल लागणार यात सध्याच्या काळात तरी कोणाला तिळमात्रही शंका वाटू नये.
किती दिवस चालणार हे बोगस कारनामे आणि अंतरात्म्यालाही फसवणारे काळे खेळ? सध्या भाजप प्रवक्त्या नुपूर शर्मा ही कुणाची बेटी आहे तर कुणाची बहिण...! त्यामुळे ती वादग्रस्त बोलली आणि तिच्यावर पक्षाने निलंबनाची तात्पूरती (अ)प्रामाणिक कार्यवाही केली तरी तिच्याविरूध्द निदर्शने आणि अटक करण्यांच्या मागणीसाठी वातावरण स्फोटक केले जात आहे. म्हणून भाजपमधील हिंदुत्ववाद्यांचे तथाकथीत दलाल आला तिला पाठींबा देण्यासाठी पुढे आलेले आहेत.करोडो रूपयांचा चुराडा करून पोलीस यंत्रणा चालविल्या जातात. त्या या देशातील जनतेचे जीवन सुरक्षित करण्यासाठी....! कारण त्यांच्याच पैशाने त्या चालविल्या जातात, अशा उपऱ्यांच्या निश्चितच नाही याची जाणीव या उन्मत्त लोकांनी ठेवली पाहिजे.अशांना पोलिस संरक्षण देण्यासाठी वादग्रस्त फालतू बडबड करणाऱ्या या नेत्यांच्या बापांचा हा पैसा आहे काय ? फुकटची खीर मिळाली तर ती कशी खावी हे अशा फुकट्या मनोरूग्णांनी स्वतःवर उपचार करून अगोदर समजून घेतलं पाहिजे. आपला धर्म जसा आपल्याला प्रिय आहे तसा तो इतरांनाही आहेच.विविधतेत एकता, तोच बंधुभाव आणि समता....! हे सहिष्णुतेचे आणि धार्मिक व जातिय आदराचे धोरण आमच्या धर्मशास्त्रांनी सांगीतले आहे,आणि संस्कृतीनेही ते स्विकारलेले आहे. ते आपण अगोदरच आत्मसात करून त्यानंतर स्वतःला समाजसेवक नेता म्हणून सिध्द केलं पाहिजे.आई बापाला शिव्या देणे ,धर्माला गौण समजणे,प्रसंगी त्यांचाही वापर राजकारणासाठीही करून घेणे, इतर समाजाला त्रास देणे हे आमचे धर्मसंस्कार नाहीत.मग त्यासोबत इतर धर्मांचा आदर हे सहिष्णुतेचे तत्व सुध्दा आलेच.हा खरा धर्म अंगिकारून त्यातील मानवी जीवनमुल्यांचे प्रशिक्षण भाजपने आपल्या नेत्यांना कधी दिलेलेच नाही.म्हणूनच या मतलबी अप्रशिक्षितांच्या,खोटारड्या धर्मवाद्यांच्या या बाजारात येथील समाजाला अशांतता आणि उद्रेकाच्या येणाऱ्या अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे.
काय बोलल्याने काय होऊ शकते याची साधी समज भाजपच्या नेत्यांमध्ये नाही हे कोणी मान्य करू शकत नाही.उलट इतर धर्मियांबध्दल मुद्दाम वादग्रस्त वक्तव्य करून धर्मांधतेच्या भट्ट्या सतत पेटवून ठेवण्याचे उन्मादी प्रयोग त्यांना सूरू ठेवायचे आहेत.जेणेकरून हिंदुत्ववाद्यांच्या मनात इतर धर्मिंयांविरोधात कट्टर द्वेषाच्या ज्वाळा भडकत राहतील.तापवत ठेवलेल्या या भट्ट्यांवर आपल्या बिनधास्त आणि अमर्याद सत्तेसाठी मग वेळपरत्वे राजकीय मतलबाच्या तंदुर रोट्या नेहमी भाजत राहता येतील.या कुटीलनीतिच्या उपदेशातूनच नुपूर शर्मा पूर्ण पाठींब्यांनी आश्वस्त होऊन आणि आयुधांचे कवच घेऊनच सरळ प्रेषित धर्मगुरूवरच शाब्दीक बाण घेऊन पुढे सरसावली असावी.कारण ही भाजपची नेहमीची खोड आहे आणि जित्याची खोड लवकर जात नाही म्हणून केवळ राजकारणासाठी सोडलेले अनेक उद्रेकी वाचाळवीर भाजपने महाराष्ट्रातही सोडलेले आहेत.ते आगाऊपणा करत राहतात,आणि जनतेच्या पैशाने चालविल्या जाणाऱ्या पोलिस यंत्रणेची आणि केन्द्रीय संरक्षणे देत ती सांभाळली जातात. यातच सरकारी तिजोरीतील पैशांचा मन मानेल तसा अपव्यय केला जात आहे.जनतेचा पैसा हा घामाचा आहे, अनेक राजकारण्यांसारखा हरामाचा...पापाचा नाही.म्हणून विकास आणि सामाजिक सेवा करता येत नसेल,तेवढी अक्कल आणि नैतिकताही शिल्लक नसेल तर जनतेच्या जीवांचे खेळ करू नये. फक्त राजकारणाचे मढे पोसण्यासाठी देशात आणि देशातील जनतेच्या जीवनात अशांतता पसरविणारे खोटे धर्म, मंदिर,मस्जिद,सोंगे,भोंगे, आणि दांभिक भक्तीचे आव आणणारे हनुमान चालिसा सारखे प्रयोग तरी करू नयेत.यातून देशाचे कोणत्याही राज्यांतील श्रमिकांचे,बेरोजगारांचे,शेतकऱ्यांचे,फक्त छोट्या उद्योजकांचे कोणतेही प्रश्न सुटणार नाहीत.उपटसुंभ धंदे करून अशांतता निर्माण करत वरून यांनाच पोलिस संरक्षण देण्याचा ठेका सरकारी तिजोरीत पैशे भरणाऱ्या जनतेने उचललेला नाही.
संकटात राजकारण,कोरोणात धिंगाणे....उठसुठ फक्त राजकारण आणि त्यासाठी खोटा धर्म हे शिसारी आणणारे उद्योग स्वार्थाचे कटोरे घेऊन फिरणाऱ्या भिकारी मनोवृत्तीच्या अनैतिक नेत्यांकडून सुरू आहेत.त्यांच्या गलिच्छ राजकारणासाठी कंकगणासारखे अनेक भिकारडे सिलेब्रेटीज डोक्यावर घेऊन नाचतात, आणि थोरा मोठ्यांचे,यांच्यासाठी रक्त सांडणाऱ्या क्रांतिकारकांचे अपमान करीत फिरतात.त्यावेळी इतर धर्मियांचा विषय आला की गळे फाडून हिंदुत्वाचे नारे देणारे दलाल आणि त्यांच्या आवाजात आवाज मिसळणाऱ्या लाचार अंधभक्तांची अस्मिता आणि देशभक्ती या लूटारू लोकांच्या संमोहनात बंदिस्त झालेली असते का ? का सोईच्या ठीकाणीच स्वतःची बुद्धी वापरण्याच्या मतलबी अकलेचा ठेवाच फक्त यांना या विश्वासघातकी लोकांकडून मिळालेला असतो? अशा अकलांचे दिवाळे निघालेल्या लोकांचे स्वार्थी राजकारण सांभाळण्यासाठी आणि त्यांना पोलिस संरक्षण देण्यासाठी सरकारी तिजोरीतून कोणताही पैसा वापरला जाऊ नये, असा कायदा करण्यासाठी जनतेनेच आता पुढे आले पाहिजे...!प्रचंड सामुहिक शक्तीने उठाव केला पाहिजे....! बापदाद्यांची मालमत्ता समजून अपात्र लोकांसाठी चुकीच्या ठीकाणी मनमानी पध्दतीने होणारी उधळपट्टी आता थांबवली पाहिजे.
मिडीया आणि सोशल मिडीयातून आपल्याला नाहक गुंतवून ठेवणाऱ्या करमणूकीच्या,सेलिब्रेटीजच्या ,स्वप्ननगरीतील फालतू विषयांवर,यांनी पसरविलेल्या दिशाभूल करणाऱ्या निखालस खोट्या धर्मांध विषयांवर व्यक्त होण्याऐवजी आपल्या जीवन मरणाच्या ,जीवाभावाच्या प्रश्नांवर मत व्यक्त करून संवेदनशीलतेने एकत्र आलं पाहिजे.....नाहीतर हे गल्लेभरू..विश्वासघातकी...उन्मादी वाचाळवीर जनतेचे शांततामय जीवन संपवून देश विकून मोकळे झाल्याशिवाय राहणार नाहीत....!हे भ्रष्टाचार आणि अनैतिकतेची माया गोळा करून यांच्या अनेक पिढ्यांची व्यवस्था करून ठेवत आहेत.मायबाप जनतेने आपली पुढील पिढी आम्हाला मुर्खात काढून त्यांच्या संभाव्य वेदनामय अनुभवातून निदान शिव्या शाप तरी देणार नाहीत, यासाठी आत्ताच कर्तव्याने समोर आलं पाहिजे.तरच प्रत्येकाचं जीवन सार्थक होईल.म्हणूनच अंधभक्तांच्या नांदी न लागता युवक आणि आबालवृध्दांनो उठा...! जागे व्हा..! सतर्क राहून कर्तव्यधर्मात सक्रिय होऊन सिध्द व्हा...!काळ कुणासाठी कधीच थांबत नाही...थांबला नाही आणि आताही थांबणार नाही...! एवढे मात्र पश्चातापापूर्वी लक्षात ठेवले पाहिजे...!
संजय एम.देशमुख,जेष्ठ पत्रकार,अकोला
मोबा.क्र. ९८८१३०४५४६
Post Views: 338