आई श्वास नवनिर्मितीचा नित्य सहनशीलता त्यागाची जन्माआधी खेळतो जीव गर्भात
कळ सोशी कर्तव्य पूर्तीची....
आई झरा रखरखत्या वाळवंटातला
तृष्णा भागते ममत्वाने
हळुवार स्पर्श मखमली
शमविते तहान शीतल नम्रतेने...
आई अशी जन्माची शिदोरी
सरतही नाही उरतही नाही
मर्म काळजातील स्पंदनांचे
अखेरच्या श्वासापर्यंत साथ सोडत नाही...
आई एक मंत्र,एक धागा,एक ग्रंथ
कठीण प्रसंगात ताठ राहणारा
एक पाऊल नेहमी मार्गातले
पावित्र्य ,चैतन्य टिकवून ठेवणारा...
आई ज्योत सदा तेवत राहणारी
निराशेला आशेने संपवणारी
एक भाषा न बोलता समजणारी
आई एक ऊर्जा संकटी बळ देणारी. ...
आई कणा घरांगणाचा
तिच्या अस्तित्वाने फुले प्राजक्त
आई हाक आर्त काळजाची
ठोका चुके हाकेने अशी अव्यक्त...
आई ममतेचे सिंधुपात्र
लाभले चंद्रभागेसम भूवरी
आई नाम जपू सदा मुखाने
विठ्ठल रुक्मिणी रुपी घावली पंढरी...
*अनिता देशमुख*
*नांदुरा(बुलढाणा)*
*हमू.--कल्याण*
Connection failed: Operation not permitted