संस्कृतच्या उद्धाराशिवाय भारताचा उद्धार अशक्य


संस्कृतभारतीच्या प्रांत संमेलनात कुलपति प्रा. विजयकुमार मेनन यांचे प्रतिपादन
 विश्वप्रभात न्यूज ब्युरो  28 Apr 2022, 11:49 AM
   

अकोला : सद्यस्थितीत केवळ भारतातच नव्हे तर जगभरातील अनेक देशांमध्ये संस्कृतोन्मुख वायुमंडल तयार होत आहे. संस्कृतच्या उद्धाराशिवाय आपल्या देशाचा उद्धार होणे अशक्य असल्याचे मत उज्जैन येथील महर्षि पाणिनी संस्कृत वैदिक विश्वविद्यालयाचे कुलपति प्रा. विजयकुमार मेनन यांनी केले. ते मोहरीदेवी खंडेलवाल कन्या विद्यालयात आयोजित संस्कृत भारतीच्या प्रांत कार्यकर्ता संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. यावेळी मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा संस्कृत भारतीचे विदर्भ प्रांत अध्यक्ष रमेश मंत्री, अखिल भारतीय मंत्री सत्यनारायण भट्ट यांची उपस्थिती होती.
संस्कृतमधील शास्त्र व भारतीय जीवनमूल्यांविषयीचे सर्वंकष ज्ञान मिळविण्यासाठी आय.आय. टी. आणि आय.आय.एम. सारख्या शैक्षणिक संस्था संस्कृत विद्यापीठांशी सामंजस्य करार करण्यासाठी स्वतःहून पुढाकार घेत आहेत, हे संस्कृतभारती गेली अनेक वर्षे चालवित असलेल्या ‘संभाषणापासून शास्त्रापर्यंत ’ या आंदोलनाचेच यश आहे, असेही  कुलपति प्रा. विजयकुमार मेनन यावेळी म्हणाले. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत असतांना आजही आपण ग्रॅगोरियन म्हणजे इंग्रजी किंवा शके या परकीयांनी निर्मिलेल्या दिनदर्शिकांवरच अवलंबून असणे ही अत्यंत खेदाची बाब असल्याचे नमूद करुन अमृत महोत्सवाच्या निमित्ताने स्वतःची राष्ट्रीय दिनदर्शिका निर्माण करण्याचे ध्येय समोर ठेवून त्यादृष्टीने प्रयत्न करण्याची आवश्यकता त्यांनी प्रतिपादित केली.
यावेळी संस्कृत हे संस्कृतीचे अभिन्न अंग असल्याचे सांगत, समाजातील सामान्यांना संस्कृत शिकविणे आवश्यक असल्याचे मत संस्कृतभारतीचे अखिल भारतीय मंत्री सत्यनारायण भट्ट यांनी व्यक्त केले. अध्यक्षीय भाषणात रमेश मंत्री यांनी संस्कृत ही देशातीलच नव्हे तर विश्वातील इतरही भाषांची जननी असल्याचे यावेळी सांगितले. यावेळी दीपप्रज्वल आणि पूजननाने संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले. उद्घाटन सत्राचे प्रास्ताविक प्रांतमंत्री भरत पंडा यांनी तर कार्यक्रमाचे संचालन जयश्री देशमुख यांनी केले. यावेळी संध्या केने यांनी मंगलाचरण गायिले.तर सुनंदा देसाई यांनी आभार मानले. यावेळी संस्कृत भारतीचे मोहन गद्रे, विभाग संयोजक धनंजय  देशपांडे, जिल्हा संयोजक प्रदीप  चौखंडे, संस्कृत भारतीचे कार्यकर्ते यासह शहरातील संस्कृतप्रेमी नागरिक उपस्थित होते .
या द्विदिवसीय संमेलनात संपूर्ण विदर्भातून 100 हून अधिक दायित्वधारक कार्यकर्ते सहभागी झाले होते. संमेलनातील विविध सत्रांमधून संस्कृतभारतीच्या संभाषण शिबिर, आवासीय भाषा बोधन वर्ग, शिबिरचालक प्रशिक्षण वर्ग, संस्कृत शिक्षकांसाठी प्रशिक्षण वर्ग, पत्रद्वारा संस्कृतम, संभाषण संदेश मासिक पत्रिका, युवक-विद्यार्थी संमेलन, बालकेंद्र, श्लोक पठण वर्ग, गीता पाठांतर वर्ग इत्यादी विविध उपक्रमांच्या अनुषंगाने गतवर्षी झालेल्या कार्याची समीक्षा करुन आगामी वर्षासाठीची योजना तयार करण्यात आली . शिबिरस्थानी आयोजित संस्कृत-विज्ञान प्रदर्शनी व संस्कृत साहित्य विक्री केंद्रालाही उपस्थितांचा भरपूर प्रतिसाद मिळाला.
संस्कृतमध्ये भारताची सांस्कृतिक अस्मिता ः डॉ.भाले
भारताची सांस्कृतिक अस्मिता संस्कृतमध्ये दडलेली असून ती जाणून घेण्यासाठी आजच्या पिढीतील युवकांनी संस्कृत भाषा आत्मसात करणे आवश्यक आहे . कमीत कमी शब्दांमध्ये मोठा आशय व्यक्त करण्याचे सामर्थ्य संस्कृतमध्ये असून संस्कृतच्या जाणकारांना विदेशात मोठी मागणी आहे . त्यामुळे विद्यार्थ्यांनी इतर विदेशी भाषा शिकण्यापेक्षा संस्कृतचे अध्ययन करावे, असे मत डॉ. पंदेकृविचे कुलगुरू डॉ. विलास भाले यांनी व्यक्त केले. ते संस्कृत भारतीच्या विदर्भ कार्यकर्ता संमेलनाच्या समारोपप्रसंगी  बोलत होते. तर सत्यनारायण भट्ट यांनी कार्यकर्त्यांच्या प्रबळ संघटनेची आवश्यकता व्यक्त केली. यावेळी बोलताना संस्कृतभारती, अकोलाच्या अध्यक्षा  सुनंदा देसाई यांनी कृषि विद्यापीठाच्या कुलगुरुंच्या उपस्थितीचे औचित्य साधत कृषि विद्यापीठाकडून कृषि क्षेत्रात संस्कृत आधारित संंशोधनाची अनुमति मिळाल्यास संस्कृतभारती सर्वतोपरी सहकार्य करेल , असे आश्वासन दिले. समारोप कार्यक्रमाचे संचालन ममता शर्मा यांनी केले तर प्रांतमंत्री भरत पंडा यांनी आभार मानले. सामूहिक शांतिमंत्र पठणाने  संमेलनाची सांगता झाली .

    Post Views:  200


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व