नाम फाउंडेशनचा विधवा शेतकरी महिलांना मदतीचा हात
जिल्ह्यातील 109 विधवा महिलांना 27 लक्ष 25 हजारांच्या धनादेशांचे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते वितरण.
अकोला.;- आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना व विधवा महिलांना दिलासा आणि मदतीचा हात देण्यासाठी नटसम्राट नाना पाटेकर व आदर्श अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी नाम फाउंडेशन या संस्थेची स्थापना केली आहे. नाम तर्फे राज्यातील शेतकऱ्यांच्या विधवा पत्नी व कुटुंबाला मदत देण्याचे काम सुरू आहे.
शुक्रवारी अकोला जिल्ह्यातील 109 आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील विधवा महिलांना प्रत्येकी 25 हजार असे एकूण 27 लक्ष 25 हजार रुपयांच्या धनादेशांचे वितरण जिल्हा नियोजन भवन येथे आयोजित कार्यक्रमात मा. जिल्हाधिकारी निमा अरोरा मॅडम यांच्या हस्ते व उपजिल्हाधिकारी प्रा. संजय खडसे, तहसीलदार सुनील पाटील, नाम फाऊंडेशनचे जिल्हा मार्गदर्शक जेष्ठ पत्रकार प्रा. मधु जाधव, सामाजिक कार्यकर्ते दिलीप सावरकर, नाम फाउंडेशनचे जिल्हा समनव्यक माणिक शेळके या मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. ही मदत विदर्भ व खान्देशचे समनव्यक तथा प्रसिद्ध दिग्दर्शक हरीश इथापे यांच्या मार्गदर्शनात देण्यात आली.
नाम च्या वतीने शेतकर्यांना आर्थिक मदतीबरोबरच एक कोटी झाडे लावणे, नदी/नाले/तलावांचे खोलीकरण व गाळ काढणे, महिलांना आत्मनिर्भर होण्यासाठी शेळ्यांचे/शिलाई मशीन चे वाटप करणे शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन, कृषी केंद्रे, रोजगार केंद्रे, दुष्काळग्रस्त भागातील तरुण, महिलांना रोजगार देण्याचे उद्देश्य असे विविध उपक्रम राबविण्यात येतात.
अकोला जिल्ह्यात नाम फाउंडेशनचे काम, जिल्हा समनव्यक माणिक शेळके यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात वाढले असून आतापर्यंत जिल्ह्यातील 45 विधवा व एकल महिलांना शिलाई मशिनचे वाटप करण्यात आले असून 146 आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला धनादेशद्वारे सानुग्रह मदत देण्यात आली आहे. याच बरोबर लोनाग्रा येथील शहीद जवान सुमेध गवई यांच्या कुटुंबाला 2.5 लाख रुपयांची मदत करण्यात आली असून करोना च्या लॉकडाऊन काळात 500 गरजू कुटूंबाला जीवनावश्यक किट (किराणा मालाचे) वाटप त्यांच्या घरोघरी जाऊन करण्यात आले. असे अनेक उपक्रम सेवाभावाने अकोला जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रभर राबविले जातात.
सुरुवातीला वयक्तिक स्तरावर महाराष्ट्रातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी १५ हजारांचा धनादेश, ब्लँकेट, साडी-चोळी, वर्षभराचे मेडिकल किट असे मदतीचे स्वरूप होते. परंतु, फक्त काही निवडक कुटुंबीयांना मदत करण्यापेक्षा या मदतीची व्याप्ती वाढवण्यासाठी नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांनी एका सामाजिक संस्थेची स्थापना करण्याचे ठरवले. मदतीचे स्वरूप फक्त आर्थिक मदत न रहाता, शेतकऱ्यांना व त्यांच्या कुटुंबियांना काही पर्यायी उत्पन्नाचे साधन उपलब्ध करून देणे याकडे पण लक्ष देता यावे यासाठीसुद्धा या संस्थेची कल्पना पुढे आली.
अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील 10, बार्शीटाकली तालुक्यातील 10, मूर्तिजापूर तालुक्यातील 19, तेल्हारा तालुक्यातील 16, पातूर तालुक्यातील 19, अकोट तालुक्यातील 14 व अकोला तालुक्यातील 29 अश्या एकूण 109 विधवा महिलांना धनादेशांचे वितरण करण्यात आले.
या प्रसंगी मा.जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी नाम फाऊंडेशन या संस्थेविषयी स्पर्धापरीक्षामध्ये प्रश्न विचारला जातो इतके मोठे कार्य या संस्थेचे आहे. शासन ज्याप्रमाणे आपली जबाबदारी पार पाडत आहे त्याच प्रमाणे नाम ही संस्था शेतकऱ्यांसाठी काम करीत आहे. हे अभिमानास्पद आहे असे मत व्यक्त केले तर निवासी उपजिल्हाधिकारी प्रा. संजय खडसे यांनी या आत्महत्याग्रस्त कुटुंबाला कुठल्याही प्रशासकीय अडचणी आल्यास त्या सोडवण्यासाठी शासन सदैव तत्पर राहील असा विश्वास दिला. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. मधु जाधव यांनी महिलांनी स्वतःला अबला न समजता वीरांगना होऊन म्हणून लढले पाहिजे व स्वतःला सिद्ध केले पाहिजे हे सांगितले. नामचे जिल्हा समनव्यक माणिक शेळके यांनी आत्महत्याग्रस्त विधवा महिलांना स्वयंरोजगार करण्याच्या हेतूने ही आर्थिक मदत असल्याचे आपल्या प्रास्ताविकात सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. नितीन ढोरे यांनी तर आभार प्रदर्शन महेश गोरे यांनी केले. कार्यक्रमाला ऍड. वंदन कोहाडे, बंडूभाऊ शेळके, भुंजगराव देशमुख, संजय वडाळकर, धनंजय ढोरे, संतोष सोनोने, विजय बोचरे, सुमेध बागलकर, यांची उपस्थिती लाभली
या सामाजिक कार्यक्रमाला यशस्वी करण्याकरिता नाम चे तालुका समनव्यक मंगेश गोळे, नरेंद्र चितोडे, गोपाल वाकोडे, देविदास कावरे, दिलीप कराळे, दीपक घाटे, दत्ता वैराळे, माणिक पारस्कर, अविनाश मातळे, शाम जवंजाळ, शिवा ठाकरे, विजय धर्माळे, शिवा भालतीलक, गणेश घावट, गजानन चिंचोळकार, रामदास गोपणारायण, सुमित ठाकरे, अक्षय भालतीलक, सुशील ठाकरे, अजय आवटे, यांनी परिश्रम घेतले.
Post Views: 329