फडणवीसांचे स्टिंग ऑपरेशन बनावट; सरकारी वकील प्रवीण चव्हाणांचा दावा
विश्वप्रभात न्यूज ब्युरो
12 Mar 2022, 7:42 PM
मुंबई : विधानसभेत पेन ड्राइव्ह सादर करत महाविकास आघाडीवर विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर आरोप केले होते. तसेच यामध्ये सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांचाही हात असल्याचा खळबळजनक माहिती या स्टिंग ऑपरेशनमधून समोर आली होती. पण हे स्टिंग ऑपरेशन बनावट असून, यातील दृश्य आणि आवाज वेगळा असल्याचा दावा प्रवीण चव्हाण यांनी केला आहे. तसेच या स्टिंग ऑपरेशनचे जळगाव कनेक्शन असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
या आरोपात कुठल्याही प्रकारचे तथ्य नाही. आरोप करणार्यांनी ज्या केसचा आधार घेतला आहे, त्याची कागदपत्रे जर आपण पाहिली तर त्यामध्ये दिसून येते की गिरीश महाजनांची त्या गुन्ह्यात काय भूमिका आहे. याचा तपास सुरू असून, तपास अधिकार्यांनी ही फाइल हायकोर्टात मांडली आहे.
माझ्या कार्यालयात नेहमी येणारा आशील तेजस मोरे यांना आपल्या घडाळ्यात छुपा कॅमेरा लावून हे स्टिंग ऑपरेशन केले आहे. त्याचा जामीन अर्ज माझ्याकडे होता, त्याचा यामध्ये सहभाग असण्याची दाट शक्यता आहे, ते घड्याळ त्यानेच आणले होते. त्याने मला एसी बसवून देतो असेही म्हटले होते. पण मी त्याला नकार दिला होता. त्यानंतर त्याने स्मार्ट टीव्ही बसवतो असे सांगितले, पण त्यालाही मी नकार दिला. कारण मी आजतागायत कोणाकडूनही भेटवस्तू स्वीकारलेली नाही. त्याने मला विविध प्रकारे प्रलोभने दिली. पण मी प्रत्येक वेळी त्याला नकार दिला. त्याचा आणि त्याच्या पत्नीचा मी यापूर्वी अटकपूर्व जामीन मिळवून दिला होता. त्याची फीदेखील अजून बाकी आहे. तो माझा आशील होता, तो जळगावचा होता. त्यामुळे त्याला हाताशी धरुन विरोधकांनी हे संपूर्ण षड्यंत्र रचलेले आहे. चौकशीत हे पूर्णपणे उघड होणार आहे.
यामध्ये आणखी कोणकोणत्या व्यक्ती आहेत हे आज ना उद्या बाहेर येणार आहे. तेजस मोरेसोबत तुरुंगात असलेला चाचू नावाचा कैदी सकाळी इथे आला होता. जो सीसीटीव्हीमध्ये दिसून येतो. हा चाचू नावाचा व्यक्ती सध्या नांदेडमध्ये पळून गेला आहे. यामध्ये सर्व कायदेशीर बाजू तपासून मी गुन्हा दाखल केल्यानंतर पुढील कारवाई करणार आहे, असेही चव्हाण यांनी सांगितले आहे.
व्हिडिओ क्लिपमध्ये फेरफार
आपण या क्लिपचे बारकाईने अवलोकन केले तर त्यात लक्षात येते की, कुठल्याही प्रकारचे यामध्ये मॅचिंग दिसून येत नाही. दुसरे म्हणजे यामध्ये जी वक्तव्य आहेत त्यात फेरफार केलेला आहे. यामध्ये आक्षेपार्ह असे कुठलेही वक्तव्य दिसत नाही. यामध्ये त्यांनी फेरफारचा केविलवाणा प्रयत्न केल्याचे स्पष्टपणे दिसून येते. आजच्या जगात व्हिडिओ आणि आवाजामध्ये फेरफार करता येतो. त्यांनी जो दावा केला आहे की, ऑफिसमध्ये हा प्रकार झालेला आहे. एक तर त्यांनी विनापरवानगी ऑफिसमध्ये येऊन गुन्हा केला आहे. त्याचबरोबर त्यांनी व्हिडिओमध्ये कटछाट केली आहे म्हणजेच त्यातील काही भाग लपवलेला दिसून येतोय. या संपूर्ण प्रकरणाची जेव्हा चौकशी होईल तेव्हा यातील सर्व सत्य बाहेर येईल, असा पुनरुच्चार सरकारी वकिल प्रवीण चव्हाण यांनी केला.
Post Views: 242