बारावी परीक्षेच्या वेळापत्रकात बदल; मराठी, हिंदीचा पेपर पुढे ढकलला


5 व 7 मार्चचा पेपर लांबणीवर
 संजय देशमुख  24 Feb 2022, 8:00 PM
   

पुणे : बारावी परीक्षेच्या वेळापत्रकामध्ये अंशतः बदल करण्यात आला आहे.  दरम्यान, काही दिवसांपूर्वी बोर्डाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, बारावीच्या  परीक्षा 4 मार्चपासून सुरू होणार आहे. मात्र, आता वेळापत्रकामध्ये अंशत: बदल करण्यात आला असून, बारावीचे 5 आणि 7 मार्चला होणारे पेपर हे आता 5 आणि 7 एप्रिलला घेण्यात येणार आहे. 
बोर्डाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार दोन पेपरमध्ये हा बदल करण्यात आला आहे. 5 मार्च रोजी होणारा हिंदीचा पेपर आता 5 एप्रिलला होणार आहे.  तर सात मार्चला होणारा मराठीचा पेपर हा सात एप्रिल रोजी घेण्यात येणार आहे. 23 फेब्रुवारीला प्रश्नपत्रिका घेऊन जाणार्‍या एका टेम्पोला पुणे-नाशिक महामार्गावर संगमनेर तालुक्यात जवळ आग लागली होती. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. दहावी बारावीच्या पुणे बोर्डाच्या प्रश्नपत्रिका घेऊन जाणार्‍या टेम्पोला चंदनापुरी घाटात मागच्या बाजूने ही आग लागली. या आगीमध्ये संपूर्ण प्रश्नपत्रिका जळून खाक झाल्या. त्यामुळे परीक्षा तोंडावर असताना प्रश्नपत्रिका जळाल्याने हे दोन पेपरची परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे आणि वेळापत्रकात अंशतः बदल करण्यात आला आहे. पाच आणि सात मार्च या तारखेला जे पेपर होते त्यातील काही प्रश्नपत्रिका या जळून खाक झाल्या आहेत. त्यामुळे बोर्डाने बैठक घेऊन या दोन विषयाचे पेपर पुढे ढकलले आहेत
5 मार्चला सकाळी हिंदी तर दुपारच्या सत्रात जर्मन, जपानी, चिनी आणि पर्शियन विषयाचे पेपर होणार होते. तर, 7 मार्चला सकाळच्या सत्रात मराठी, गुजराती, कन्नड, सिंधी, (अरेबिक, देवनागरी), मल्याळम, तामिळ, तेलुगू, पंजाबी, बंगाली आणि दुपारच्या सत्रात उर्दू, फ्रेंच, अर्धमागधी, स्पॅनिश आणि पाली विषयाचा पेपर होणार होता. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्याकडून बारावीच्या परीक्षा 4 मार्च ते 30 मार्च या कालावधीत घेण्यात येतील. प्रात्याक्षिक परीक्षा, श्रेणी परीक्षा 14 फेब्रुवारी ते 3 मार्चमध्ये होतील. कोरोना आणि इतर कारणामुळे अडचण आल्यास 31 मार्च ते 18 एप्रिल या कालावधीत प्रात्यक्षिक परीक्षा होतील. 

    Post Views:  306


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व