देशमुख पोलिस बदल्यांसाठी अनधिकृत याद्या पाठवायचे
सीताराम कुटेंचा ईडीसमोर गौप्यस्फोट
मुंबई : मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी लेटर बॉम्ब टाकत 100 कोटींच्या वसुलीबाबत गौप्यस्फोट केला. त्यानंतर या प्रकरणात तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांना आपल्या पदावरून पायउतार व्हाव लागले. त्याच दरम्यान आता राज्याचे माजी मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी दिलेल्या माहितीमुळे आता अनिल देशमुख यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
100 कोटी रुपयांच्या वसुलीच्या संदर्भात ईडीच्या अधिकार्यांनी अनेक अधिकार्यांचे जबाब नोंदवले आहेत. त्यात राज्याचे तत्कालीन मुख्य सचिव सीताराम कुंटे यांचाही जबाब नोंदवण्यात आला आहे. राज्याचे तत्कालीन मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी ईडीच्या अधिकार्यांसमोर एक मोठा आणि धक्कादायक गौप्यस्फोट केला असल्याची माहिती समोर आली आहे.
सीताराम कुंटे यांनी ईडीसमोर दिलेल्या जबाबानुसार, अनिल देशमुख गृहमंत्री असताना पोलिसांच्या बदल्यांसाठी अनधिकृत याद्या पाठवायचे. मी त्यांच्या अधीन काम करत होतो आणि त्यामुळे त्या याद्या स्वीकारायला मी नकार देऊ शकत नव्हतो. सीताराम कुंटे यांच्या जबाबामुळे एकच खळबळ उडाली आहे. आता सीताराम कुंटे यांनी केलेल्या या गौप्यस्फोटमुळे अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ होणार असल्याचे बोलले जात आहे.
सीताराम कुंटे गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात मुख्य सचिव पदावरुन निवृत्त झाले. यानंतर त्यांची मुख्यमंत्री सचिवालयात प्रमुख सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली. इतकेच नाही तर सीताराम कुंटे हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय असल्याचं बोलले जाते. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनीही अनिल देशमुख यांच्यावर बदली, पोस्टिंगमध्ये हस्तक्षेप करण्याचा आरोप केला होता. परमबीर सिंग यांनी म्हटले होते की, जुलै 2020 मध्ये मुंबईतील 10 पोलिस अधिकार्यांच्या बदलीचे आदेश दिले होते. त्यासाठी दोन दिवसात त्यांना तत्कालीन मुख्य सचिव सीताराम कुंटे यांचा व्हॉट्सअप मेसेज आला होता.
Post Views: 266