प्रा. प्रकाश डवले यांची शिवसेना विदर्भ प्रवक्तेपदी\' जाहीर निवड


 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  09 Jun 2026, 2:08 PM
   

अकोला : संपर्क मंत्री मा. ना. प्रताप सरनाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत सोहळा संपन्न झाला . डवले सरांच्या अष्टपैलू सामाजिक कार्याची शिवसेनेकडून मोठी दखल घेण्यात आली.
      शिवसेना (शिंदे गट) आयोजित अकोला जिल्हा पदाधिकारी व S.I.R मार्गदर्शन शिबिर काल सोमवार, ८ जून २०२६ रोजी गोरक्षण रोडवरील 'शुभमंगल मंगल कार्यालय' येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाले. अकोला संपर्क मंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री मा. ना. प्रताप सरनाईक साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या ऐतिहासिक शिबिरात, अकोल्याचे ख्यातनाम शिक्षणतज्ज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ते प्रा. प्रकाश डवले यांची शिवसेना पक्षाच्या 'विदर्भ प्रवक्तेपदी' अधिकृत घोषणा करण्यात आली. त्यांच्या या निवडीने अकोल्यासह संपूर्ण विदर्भातील राजकीय व सामाजिक वर्तुळातून आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
     अष्टपैलू सामाजिक आणि शैक्षणिक कार्याचा गौरव यानिमित्त झाला . प्रा. प्रकाश डवले सरांची ही निवड त्यांच्या गेल्या अनेक वर्षांच्या निस्सीम समाजसेवेचे आणि संघटन कौशल्याचे द्योतक आहे. त्यांनी आजवर राबवलेले विविध उपक्रम पक्षासाठी आणि समाजासाठी दिशादर्शक ठरले आहेत. प्रामुख्याने धार्मिक व सांस्कृतिक कार्यात अकोला जिल्ह्यात येणाऱ्या 'संत श्री गजानन महाराज पालखी सोहळ्याचे' दरवर्षी त्यांच्या माध्यमातून अत्यंत अभूतपूर्व आणि भक्तीमय वातावरणात स्वागत केले जाते. आरोग्य सेवेमध्ये सर्वसामान्यांसाठी मोफत रक्त तपासणी शिबिरे आणि भव्य आरोग्य तपासणी शिबिरांचे सातत्याने आयोजन करून त्यांनी हजारो रुग्णांना वैद्यकीय मदत मिळवून दिली आहे. शैक्षणिक क्रांती द्वारे गुणवंत विद्यार्थ्यांचा जाहीर सत्कार सोहळा आणि स्पर्धा परीक्षा देणाऱ्या तरुणांसाठी 'विद्यार्थी मार्गदर्शन शिबिरांचे' आयोजन करून त्यांनी शेकडो विद्यार्थ्यांना यशाचा मार्ग दाखवला आहे.
     शिवसेना उपक्रम व संवाद यात्रा दरम्यान शिवसेनेचे ध्येय-धोरण तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी संवाद यात्रा व विविध जनसंपर्क मोहिमा प्रभावीपणे राबवल्या आहेत. या कार्यक्रमांमध्ये दिग्गजांची उपस्थिती लाभली आहे. या भव्य सोहळ्याला राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री ना. श्री. संजयभाऊ राठोड, आमदार तथा अष्टपैलू नेते मा. श्री. बच्चूभाऊ कडू, अकोला लोकसभा संपर्कप्रमुख व माजी आमदार डॉ. राजनजी साळवी, उपनेते गोपीकिशन बाजोरिया , युवा सेना सचिव विठ्ठल सरप , संपर्कप्रमुख संजना गवळी , जिल्हाप्रमुख नारायण गव्हाणकर , श्रीरंगदादा पिंजरकर , चंद्रशेखर पांडे गुरुजी , अश्विन नवले , उषा विरक , रेखा राऊत , महानगरप्रमुख राजेश मिश्रा , योगेश अग्रवाल , अनिल मालगे , डॉ. अभिजित प्रकाश डवले, आदित्य ठाकूर यांच्यासह शिवसेनेचे विदर्भातील सर्व प्रमुख पदाधिकारी, महिला आघाडी आणि हजारो कार्यकर्ते उपस्थित होते.
      पक्षाची बाजू विदर्भात भक्कमपणे मांडणारे प्रा. डवले आपल्या नियुक्तीनंतर कृतज्ञता व्यक्त करताना प्रा. प्रकाश डवले म्हणाले, "पक्षप्रमुख आणि वरिष्ठ नेत्यांनी माझ्या सामाजिक कार्याची दखल घेऊन जी जबाबदारी दिली आहे, तिला मी पूर्ण न्याय देण्याचा प्रयत्न करेन. विदर्भातील जनतेचे प्रश्न आणि पक्षाची भूमिका अत्यंत प्रभावीपणे आणि अभ्यासू वृत्तीने मांडणे हेच माझे मुख्य ध्येय असेल." प्रा. प्रकाश डवले सरांच्या या निवडीबद्दल त्यांचे सर्वच थरांतून अभिनंदन होत असून, त्यांच्या अभ्यासू आणि वक्तृत्व कौशल्याचा विदर्भात शिवसेनेला मोठा फायदा होईल, असा विश्वास राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केला आहे.


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व