प्रसिद्ध कवयित्री सौ. छाया सुभाष वांगडे यांच्या शब्दांचे इंद्रधनु कविता संग्रहाचा प्रकाशन सोहळा उत्साहात संपन्न
विश्वाप्रभात न्यूज ब्युरो
23 Dec 2025, 12:57 PM
मुंबई : साहित्यप्रेमींच्या उपस्थितीत आणि मंगलमय वातावरणात प्रसिद्ध मराठी कवयित्री सौ. छाया सुभाष वांगडे यांच्या शब्दांचे इंद्रधनु या पहिल्या कविता संग्रहाचा प्रकाशन सोहळा रविवार, २१ डिसेंबर २०२५ रोजी मुंबईत मोठ्या उत्साहात पार पडला. सर्जनशील पब्लिकेशनद्वारे प्रकाशित या कविता संग्रहाचे प्रकाशन परळ येथील राष्ट्रीय मिल मजदूर संघात संपन्न झाले.
या सोहळ्याचे अध्यक्षस्थान ज्येष्ठ साहित्यिक श्री. पुष्पराज गावंडे यांनी भूषवले. शिवसह्याद्री परिवाराचे संस्थापक श्री. ज्ञानेश्वर वांगडे (भाई) यांच्या हस्ते पुस्तकाचे अधिकृत प्रकाशन करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे सुप्रसिद्ध कवयित्री तथा अभिनेत्री श्रीमती ललिता गवारी उपस्थित होत्या.
याप्रसंगी सर्जनशील शब्दवेल साहित्य संघाचे अध्यक्ष श्री. प्रवीण बोपुलकर यांनी संग्रहातील कवितांवर भाष्य करताना सौ. वांगडे यांच्या काव्यप्रतिभेचे कौतुक केले. कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन सर्जनशील शब्दवेल साहित्य संघाच्या सचिव सौ. अश्विनी निलेश अतकरे यांनी केली. श्रीकेदारनाथ धाम, ग्रामविकास मंडळ, नित्रळ, समर्थ सातारा प्रतिष्ठान, बोलकी लेखणी अशा विविध संस्थेच्या वतीने अनेकांनी प्रकाशन सोहळ्याला शुभेच्छा दिल्या, सोहळ्याचे सुंदर आयोजन सुभाष वांगडे व कार्यवाहन किरण वांगडे यांनी केले.
शब्दांचे इंद्रधनु हा सौ. छाया वांगडे यांचा पहिलाच कविता संग्रह असून यात निसर्ग, प्रेम आणि सामाजिक भान जपणा-या १०० निवडक कवितांचा समावेश आहे. आपल्या मनोगतात कवयित्री म्हणाल्या की, कविता माझ्यासाठी श्वास आहे. हा संग्रह वाचकांच्या मनाला नक्कीच भिडेल, असा मला विश्वास आहे. या सोहळ्याला मुंबई आणि परिसरातील साहित्यप्रेमी, लेखक आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. दर्जेदार साहित्याची निर्मिती करणाऱ्या सर्जनशील पब्लिकेशनच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
Post Views: 120