पालघर - (संतोष घरत) : मासवण- नागझरी ह्या रस्त्याची अक्षरशः चालन झाली आहे. हा रस्ता लवकरात- लवकर दुरुस्त व्हावा ह्या करिता, अनेक संघटनाने पुढाकार घेऊन निवेदने दिली होती, परंतु गेंड्याची कातडी असणारे प्रशासनाचे अधिकारी व प्रशासन डोळे झाक करत आहे. या रस्त्याने अनेक शाळकरी मुले व्यावसायिक, चाकर मणी ,वयोवृद्ध, महिला असे अनेक लोक प्रवास करतात .त्याचप्रमाणे एखादा व्यक्ती आजारी पडल्यास त्याला दवाखान्यांमध्ये तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्याचप्रमाणे ह्या खराब रस्त्यामुळे अनेक अपघात झाले आहेत. हा रस्ता एवढा खराब झाला आहे की रस्त्यात खड्डा की, खड्ड्यात रस्ता हेच कळत नाही.
सतत पाठपुरवठा करून सुद्धा ह्या रस्त्याचे काम सुरू न झाल्याने मासवड नागझरी येथील ग्रामस्थ आक्रमक होऊन अखेर आज संघर्ष संघर्ष समितीच्या वतीने मनोर -पालघर ह्या मुख्य महामार्गावर मासवण येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले, ह्या आंदोलनामुळे वाहनांच्या रांगाच रांगा लागलेल्या बघावयास मिळाल्या.
भ्रष्ट प्रशासनाच्या निषेधार्थ आज रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यामध्ये झाडे लावत निषेध व्यक्त केला तसेच पडलेल्या खड्ड्यांमध्ये साचलेल्या पाण्यात जाळे टाकून मासेमारी करण्याचा कार्यक्रमही आयोजित केला होता. काही नागरिकांनी तर आपल्या डोक्यावरचे केस कापून मुंडन करून निषेध व्यक्त केला. ह्या आंदोलनामध्ये शालेय विद्यार्थी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते, त्याचप्रमाणे राजकीय पुढाऱ्यानी देखील ह्या आंदोलनास हजेरी लावली असुन. बोईसर विधानसभेचे आमदार राजेश पाटील ह्यानी ह्या आंदोलनामध्ये सहभाग घेतला होता.
आंदोलनाचे निवेदन घेण्यास सार्वजनिक बांधकामाचे अधिकारी हेमंत भोईर आले असता नागरिकांनी निवेदन देण्यास विरोध केला. कि ही जबाबदार व्यक्ती नाही. ह्यावेळेस कुणबी सेना प्रमुख विश्वनाथ पाटील यांनी सांगितले की जिल्ह्याचे जिल्हाधिकारी किंवा तहसीलदार निवेदन स्वीकारतील तरच आम्ही आंदोलन मागे घेऊ अन्यथा आम्ही आंदोलन सुरूच ठेवू. तदनंतर प्रशासनाचे सक्षम अधिकारी यांनी निवेदन स्वीकारले असून एक-दोन दिवसातच रस्ता दुरुस्तीचे काम सुरू केले जाईल असे आश्वासित केल्या नंतर आंदोलन मागे घेण्यात आले. मासवन-नागझरी रस्ता खराब होण्यास कारणीभूत असणारे प्रशासनाचे अधिकारी व ठेकेदार याच्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्याची मागणी ह्या निवेदना द्वारे करण्यात आली आहे .
Post Views: 292