मिराताईंच्या कवितांमध्ये आपल्या जगण्याचं प्रतिबिंब! : डॉ. गजानन नारे
विश्वाप्रभात न्यूज ब्युरो
29 Oct 2022, 12:03 PM
अकोला : कविता ही मनातील भावनांचं एक लेणं असते . तिच्यामुळे कवीचं मन समृद्ध होते आणि त्यासोबत रसिकांच्या मनावरही ती संस्कार करते , मिराताईंच्या कविता ह्या फक्त कविता नसून तुमचं आमचं जगणं होय , असे भावोद्गार अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे सदस्य तसेच प्रभात किड्सचे संचालक डॉ. गजानन नारे यांनी सौ मीराताई अरविंद ठाकरे यांच्या रांगोई या काव्यसंग्रहाच्या प्रकाशनप्रसंगी अध्यक्षपदावरून बोलताना काढले .
गुरुवार , दि. 27 ऑक्टोबर 2022 रोजी मुकुंदनगर, अकोला येथील श्री गजानन महाराज मंदिराचे सभागृहात या काव्यसंग्रहाचे प्रकाशन प्रथितयश कथालेखक सुरेश पाचकवडे व मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले .
मीराताईची कविता मराठी भाषेचा गोडवा गाणारी असून ती मातीवरच्या माणसांचा, त्याच्या अंत:करणाचा प्रामाणिक उद्गार म्हणूनही सिद्ध होते, मानवी जीवनाचे रंगीबेरंगी प्रतिबिंब या कवितांमध्ये दिसून येतात असे भावनिक उद्गार सुरेश पाचकवडे यांनी केले. या प्रकाशन समारंभाला सुप्रसिद्ध गझल लेखिका देवीकाताई देशमुख , युवाकादंबरीकार तथा महाराष्ट्र राज्य साहित्य सांस्कृतिक मंडळाचे सदस्य पुष्पराज गावंडे , बोलीभाषा अभ्यासक तथा प्रकाशक डॉ. रावसाहेब काळे प्रमुख अतिथी म्हणून साहित्य पिठावर उपस्थित होते , यांनीही रांगोळी काव्यसंग्रहावर भाष्य केले . या प्रकाशन सोहळ्याचे बहारदार संचालन सुपरिचित साहित्यिक डॉ. विनय वसंतराव दांदळे यांनी केले तर आभारप्रदर्शन अमर ठाकरे यांनी केले .
मिराताई ठाकरे यांच्या काव्य गायनाने या कार्यक्रमाची सांगता झाली . या प्रकाशन सोहळ्याला अकोल्यातील साहित्यिक सौ. कविता राठोड , प्रा. महादेव लुले , प्रा. डॉ. सुहास उगले , तुळशीराम बोबडे , लांडे साहेब , डॉ. सहदेव रोठे , शिवलिंग काटेकर , हिम्मत ढाळे , अरविंद ठाकरे , निलेश कवडे , प्रवीण ठाकरे , प्रताप ठाकरे , प्रा. संजय कावरे , राजू चिमणकर प्रा. मोहन काळे , गजानन काळे डॉ. सुनिता कदम , सौ माधवी कापसे -चांदेकर , संदीप देशमुख यांचेसह परिसरातील बहुसंख्य साहित्यिक उपस्थित होते .
Post Views: 215