प्रदुषण...!प्रदुषण!!....प्रदुषण...!!! हा शब्द एव्हाना सगळ्यांचा तोंडपाठ झाला आहे.त्याचा प्रादुर्भाव नैसर्गिक,वैचारिक,मानसिक प्रदुषणापलिकडे आता राजकारणातही मोठ्या प्रमाणात होऊ लागला.त्यामुळे राजकारणातील प्रदुषण गेले म्हणून स्वतःला स्वच्छ समजणारे पर्यावरणवादी कोषातून बाहेर आलेले आहेत.त्यामुळे त्यांच्यासोबतच स्वच्छ भारत अभियानाच्या हवेतील घोषणेतून निर्माण झालेले स्वच्छतादुत म्हणून मिरवणारांना न समजण्याएवढी जनताही आता नासमज राहिलेली नाही. तरीही या प्रदुषणाची सोईनुसार कारणे शोधून दुसऱ्याला दुषणे देण्यातच धन्यता मानणाऱ्या राजकीय नेत्यांचा हल्ली विक्रमी सुळसुळाट झालेला आहे.असे नेते स्वत:ला मात्र नैतिक, प्रामाणिक, शुध्द आणि कलंकविरहीत धुतल्या तांदळासारखे स्वच्छ धवल समजतात.ही आजच्या राजकारण्यांची डोळे लावून दुध पिण्याची वृत्ती आहे. मग ती वृत्ती की अपप्रवृत्ती हा एक मोठा संशोधनाचा विषय आहे.जसा आता बंडखोरांनी ५० खोके हे डोंगर झाडी हाटेल सारं ओक्के करत घेतले की नाही हा शोधाचा विषय आहे. परंतू ईडीला मात्र न दिसणारा आहे. आजच्या बदललेल्या राजकीय प्रदुषणाच्या काळात आर्थिक तजविज झाल्याशिवाय म्हणजेच काही घेतल्याशिवाय काहीच घडत नाही,हे न समजण्याईतपत महाराष्ट्रातील जनता आता दुधखुळी राहिलेली नाही.
त्यामुळे स्वत:च भ्रष्टवृत्तीने वाटचाल करून अनैतिकतेचा कोरोना पसरविणारेच उलट्या बोंबा मारत ईतरांना चोर म्हणायला लागले तर या शिमग्याला काय म्हणावे? त्यांनीच मग राजकारणातून कुणाला बाहेर काढले, कुणाचे पद गेले म्हणून राजकारणातील प्रदुषण आता संपले म्हणावे याला काही अर्थ आहे काय? ही प्राविण्यप्राप्त अप्रामाणिकता, दांभिकता आणि अशुध्दतेवरही मात करणारी शुध्द बेइमानी म्हणजे मानवी जीवनमुल्ल्यांशी प्रतारणा करणारे भयंकर वैचारीक प्रदुषण ठरत नाही का? आता या प्रश्नांची उत्तरे मागावित तरी कुणाकडे? असे कोणी शिल्लक आहेत का? कारण मानवी जीवनमुल्यांची एवढी प्रचंड घसरण झालेली आहे की या मतलबाच्या दुनियेत वावरणाऱ्या अनेक राजकीय नेत्यांसोबत सामाजिक आणि अध्यात्मिक क्षेत्रातील बहूसंख्य व्यक्ती सुध्दा या अंध:पतनात आज आघाडीवर आहेत. प्रामाणिक कर्तव्यपरायण,गृहस्थीधर्म सांभाळणाऱ्या भारतीय संस्कृतीतील आदर्श नारीकडून पारिवारीक कर्तव्ये आणि सेवाभाव तथा गृहस्थीधर्माची मुल्ल्ये काय असतात हे समजून घेण्यासारखे असते. नवपरिणीत विवाहितेला तेच आदर्श म्हणून अवगत करण्यासारखे असतात.परंतू मतलबाच्या लॉटरीसाठी निष्ठा विकून सतत नवे नवे घरठाव करणारींकडून ही मुल्ये शिकण्याची अपेक्षा करणे म्हणजे संपूर्ण संसाराचे वाटोळे करून अधोगतीच्या मार्गाने प्रवास करणे ठरेल.त्याचप्रमाणे मग राजकारणात रोज रोज नवे सहकारी शोधणाऱ्या बिघडलेल्या राजकारण्यांचे हे निरोगी समाजव्यवस्थेत रात्रंदिन चालणारे खेळ म्हणावेत तरी कुणासारखे ?
अशी ही परिस्थिती सध्या देशात निर्माण झाली असून दिल्लीतून हातपाय पसरणाऱ्या या विनाशी कोरोनाची लागण महाराष्ट्रातही प्रचंड प्रमाणात झाली आहे. आता झारखंडमध्येही अशांच्या सरकारपाडू अभियानाची गडबड चालू झालेली आहे. राजकारणातील या धोकेबाज, कावेबाज आणि निष्ठा विकून सेवाभाव आणि कर्तव्याशी बेइमानी करणाऱ्या लाचारांचे आता अध्यात्मिक क्षेत्रातील व्यक्तीही गुणगौरव करायला लागलेल्या आहेत. हे या संस्कृतीप्रधान देशात घडणारे फार मोठे आश्चर्य आहे.सतत स्वार्थाची घबाडे शोधण्यात मग्न असणाऱ्या लाचारांमध्ये आता बुवा बाबांचीही गिणती व्हायला लागलेली आहे. त्यामुळे अनेक अध्यात्मिक बाबा हे आता दिव्य दृष्टी गमावून आलेल्या अंधत्वाने स्वार्थाच्या दलदलीत बसलेले राजकीय बाबा होऊन बसलेले आहेत. त्यांची दिव्य भविष्यवाणी ऐकायला आणि लोकांना मुर्ख बनवून घडविले जाणारे चमत्कार बघायला काही राजकीय नेते फारच आतुर झालेले असतात.अनुचित लोकांच्या विजयासाठी दलाल म्हणून भुमिका बजावणारे हेच ते बुवा बाबा आहेत. ज्यांच्या जोडीने आंदोलनं, उपोषणे करणाऱ्या नकली सामाजिक नेत्यांनी देशातील तमाम नागरीकांची घोर फसवणूक केलेली आहे. त्यामुळे यांच्या पापांची प्रायश्चित्ते देण्यासाठी नियतीने आता कोणती दरवाजे उघडावित हे ठरविले जाणार आहे. यांच्या निवाड्यासाठी तिला आता मानसिक क्लेश,वेदना भोगणाऱ्या देशातील जनतेलाच साक्षीदार म्हणून सोबत घ्यावे लागणार आहे.
दिल्लीच्या मैदानातून पंजाबी ड्रेस घालून पळ काढणाऱ्या धंदेवाईक बाबाला त्यानंतरच्या सरकारच्या आशीर्वादाने दलालीचा मोबदला म्हणून अत्यल्प मोबदल्याच्या जमिनी,पैसा,आर्थिक सवलती मिळाल्यात. त्यांच्या जोडीतील गांधीवादी समाजसेवकही आता सगळ्या मागण्या मान्य झाल्याच्या आनंदात रामराज्य आल्याप्रमाणे सुखाने झोपा काढत आहेत. आता ते धृतराष्ट्र झालेले आहेत.त्यामुळे त्यांना आता कुठेच भ्रष्टाचार, अनाचार दिसत नाही.स्वच्छ शासन आणि ईमानदार, कर्तव्यतत्पर प्रशासनाच्या कारभारात देशातील जनता समस्यारहीत आनंदाचे जीवन जगत असल्याचे त्यांना दिसते आहे.राजकारणात भाग घेण्याची उपरती या काही नकली बुवा बाबा, साध्व्या आणि समाजसेवक, सेविकांना जेव्हापासून झाली त्या क्षणापासून जनतेच्या जीवनाला अवकळा आली.परंतू राजकिय नेत्यांप्रमाणेच या परजीवी लोकांचे जीवनमान मात्र कोट्यवधींच्या पापांच्या मायेने झपाट्याने बदलत गेले आहे.
स्वत:चे उखळ पांढरे करून घेण्यासाठी सरड्याप्रमाणे रंग बदलून कोणत्याही राजकीय नेत्यांवर वारेमाप स्तूतीसुमने कशी उधळावीत. अयोग्य माणसाला योग्य आणि अनैतिकाला नीतिमान असल्याची प्रमाणपत्रे कशी द्यावीत, यांचे राजकीय धडे आता अशा पाखंडी बाबांकडून घेण्यासाठी राजकारण्यांची रिघ लागलेली आहे. देशातील जनता सुध्दा याच बुवा बाबा आणि अशा नकली योगीनींचे शब्द प्रमाण मानते. त्यामुळे गारूडी खेळातील या दरबारी मदाऱ्यांनी आता कोणते नेते आणि कोणते सरकार देशात आणि राज्यात आले पाहिजे या वातावरणनिर्मितीची दुकाने थाटलेली आहेत. त्यामुळे देशाचे आणि देशातील जनतेच्या जीवनमानाचे काहीही वाटोळे झाले तरी यांच्या करोडोंच्या संपत्तीचे ध्येय मात्र साध्य झाले पाहिजे. असे हे जनतेचे तारणहार असल्याचे आव आणणारे समाज आणि देशद्रोहीच येथील निरोगी समाजव्यस्थेचे मारेकरी ठरलेले आहेत.अशा चमत्कारी महापुरूषांना आणि वाचाळ महानारींना शरण जाण्याचे योग शोधणाऱ्या राजकीय पुढाऱ्यांची अशा दरबारांमध्ये लाईन लागलेली असते.खोटी कुंभाडं रचत यशाचे शिखर चढणाऱ्यांना आज आकाश ठेंगणे झालेले आहे. त्यामुळे.... उन्मत्त झालेत बहू आवरेनात कुणाला , प्रजासत्ताकात या प्रजेचीच दैना, सज्जन राजा न चाले बेईमाना , म्हणूनी लाचार सारे येती आश्रयाला अशी हा भ्रष्ट,बेइमान,विश्वघातकी आणि माणूसकी हरविलेल्या जीवघेण्या कोरोनाच्या भ्रष्ट जंतूंच्या साखळीने अख्खा मानवी समाज आज ग्रासून टाकलेला आहे .अजगराप्रमागे अक्राळ विक्राळ वेटोळं पसरून समाजाच्या आयुष्यांचे लिलाव करणाऱ्या या परजीवी विषवल्लींचे फोफावणे नियंत्रणात आल्याशिवाय देशातील आणि राज्या राज्यातील जनता मोकळा श्वासासाठी प्रदुषणविरहीत हवा आणि आनंदाचे जीवन लाभणार नाही. या संसर्गजण्य भयानक कोरोनाने पसरलेले प्रदुषण संपविण्यासाठी आता जनसंघटनांची वज्रमुठ आवळल्याशिवाय ह्या शफारलेल्या जमाती वठणीवर येऊ शकत नाहीत.हे सत्त्य ओळखून भविष्यातील पावलं जनतेला टाकावी लागणार आहेत. हे भयंकर आणि तेवढेच ज्वलंत सत्त्य जर देशातील आणि राज्या राज्यातील जनतेला वेळीच ओळखून जबाबदाऱ्या आणि कर्तव्ये अंगिकारता आली नाहीत, तर संपूर्ण समाजजीवनावर संक्रांत आणणारा हा राजकीय प्रदुषणाचा कोरोना मानगुटीवर बसेल,आणि उद्या डोक्यावर चढून आपल्या हुकूमशाहीचे अबाधित साम्राज्य निर्माण केल्याशिवाय राहणार नाही....! तुर्त एवढेच....!!
Post Views: 319