मराठ्यांचा आवाज हरपला; शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटेंचे अपघाती निधन


बीडमध्ये आज होणार अंत्यसंस्कार
 विश्वप्रभात न्यूज ब्युरो  14 Aug 2022, 10:07 PM
   

मुंबई : शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे (वय 52) यांच्या गाडीला भीषण अपघात होऊन त्यात त्यांचे निधन झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी, (14 ऑगस्ट) घडली आहे. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील माडप बोगद्याजवळ हा भीषण अपघात झाल्याचे समोर आले आहे. या अपघातामध्ये विनायक मेटेंना गंभीर जखमी अवस्थेत कामोठेतील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. दरम्यान, विनायक मेटे यांच्या पार्थिवावर बीडमध्ये 15 ऑगस्टला दुपारी 3 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
विनायक मेटे आपल्या एक सहकारी आणि बॉडीगार्ड यांच्यासोबत मुंबईच्या दिशेने येत असताना हा अपघात झाला. रविवारी दुपारी 12 वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत मराठा आरक्षणासंदर्भातील बैठकीसाठी ते मुंबईला येत होते. 
विनायक मेटे यांच्या कारला एका मोठ्या ट्रकने बाजूने धडक दिल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. आम्ही बीडवरून मुंबईकडे येत होतो. आम्हाला एका मोठ्या ट्रकने कट मारला. ट्रकच्या बंपरमध्ये कार अडकली आणि काही अंतरापर्यंत फरपटत गेली. आमचा अपघात 5 वाजता झाला. पण मदत पोहोचण्यासाठी एक तास लागला. मी फोन केला तेव्हा कंट्रोल रूमवरच्या कर्मचार्‍यांनी तातडीने प्रतिसाद दिला नाही. जवळपास 6 वाजता रुग्णवाहिका आली, अशी माहिती विनायक मेटेंचा अपघात झाला तेव्हा त्यांच्यासोबत असणारे सहकारी एकनाथ कदम यांनी प्रसिद्धी माध्यमांना दिली.
विनायक मेटेंचा मृत्यू डोक्याच्या मागच्या बाजूला झालेल्या गंभीर दुखापतीमुळे झाल्याची शक्यता आहे. विनायक मेटेंचा अपघात पहाटे 5 च्या सुमारास रसायनीजवळ झाला. त्यांना फार गंभीर जखमा झाल्या होत्या. बहुतेक त्यांचे घटनास्थळीच निधन झाले होते. त्यांना 6 वाजून 20 मिनिटांनी आमच्या रुग्णालयात आणले गेले. इथे आणल्यानंतर त्यांना लगेच तपासण्यात आले. त्यानंतर त्यांना मृत घोषित करण्यात आले. त्यांच्यासोबत गाडीचे चालक आणि बॉडीगार्ड होते. बॉडीगार्डला देखील गंभीर दुखापत झाली आहे. त्यांच्यावर उपचार सुरू असून, त्यांच्या चालकाची प्रकृती स्थिर आहे, अशी माहिती एमजीएम रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉ. कुलदीप सलगोत्रा यांनी दिली.
दरम्यान, विनायक मेटे यांच्या निधनानंतर राजकीय वर्तुळातून शोक व्यक्त करण्यात येत आहे.
मराठा नेत्याने व्यक्त केला संशय
शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे हे रात्रीच बीडवरून मुंबईसाठी निघाले होते. शनिवारी त्यांना मंत्रालयातून दोनदा फोन आले होते. सुरुवातीला रविवारी दुपारी 4 वाजता बैठक ठरली होती. सायंकाळी 7 वाजता त्यांना फोन करून तातडीने मुंबईला या, बैठक 12 वाजता होणार आहे, असे सांगण्यात आल्याचा गौप्यस्फोट मराठा आंदोलनाचे नेते दिलीप पाटील यांनी केला आहे. 
मेटे यांनी दोन्ही फोन आले तेव्हा मी बीडमध्ये होेतो. एवढ्या तातडीने मुंबईला कसा पोहोचेन असे त्या फोनवर पलिकडील व्यक्तीला कळविले होते. परंतू, त्यांच्यावर मुंबईला तातडीने येण्यासाठी दबाव कोणी टाकला, याची चौकशी झाली पाहिजे, असे पाटील म्हणाले. याचबरोबर दुपारी 4 वाजता बैठक ठरली होती. जर वेळ बदलली नसती तर मेटे सकाळी निघून दुपारपर्यंत मुंबईला पोहोचले असते. दुपारी 12 ची वेळ ठेवल्याने मेटे रात्रीच मुंबईला जाण्यासाठी निघाले. ही वेळ कोणी बदलली असा सवाल त्यांनी केला आहे. 
गाडीचा चालक पोलिसांच्या ताब्यात
गेल्या तीन वर्षापासून एकनाथ कदम हेच विनायक मेटे यांच्या गाडीचे चालक आहेत. एवढेच नाहीतर ते मेटेंच्या घरच्यांनाही गाडीद्वारे सोडत होते. कदम हे मूळचे बीड जिल्ह्यातील असून, त्यांच्याबद्दल आपल्या मनात काही नसल्याचे मेटेंच्या कुटुंबातील सदस्याने यापूर्वीच सांगितले होते. मात्र, आता त्यांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. शिवाय त्यांची आरोग्य तपासणीही केली जाणार आहे.
शिवसेनेने उपस्थित केली शंका...
शिंदे आणि भाजपाचे सरकार स्थापन झाले होते, तेव्हा मेटे यांनी काहीच प्रतिक्रिया दिली नव्हती. मेटे यांना कोणी फोन करून बोलावले, याची चौकशी व्हावी अशी मागणी अरविंद सावंत यांनी केली आहे.
राज्यपालांची मेटे यांना शद्धांजली
राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष  विनायक मेटे यांच्या अपघाती निधनाचे वृत्त अत्यंत धक्कादायक आहे. त्यांचे सामाजिक कार्य तसेच उपेक्षित समाज घटकांच्या विकासातील योगदान मोठे आहे. दिवंगत मेटे यांना भावपूर्ण शद्धांजली, असे राज्यपालांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.
धडाडीचे नेतृत्व हरपले : मुख्यमंत्री
शिवसंग्राम संघटनेचे संस्थापक, माजी आमदार विनायक मेटे यांचे अपघाती निधन अत्यंत धक्कादायक आणि वेदना देणारे  आहे. त्यांच्या निधनाने  मराठा आरक्षणासह, सामाजिक चळवळीचा बुलंद आवाज, धडाडीचे नेतृत्व हरपले अशा शब्दांत मुख्यमंत्री  एकनाथ शिंदे यांनी  विनायक मेटे यांच्या निधनाबद्दल शद्धांजली अर्पण केली आहे.
दुःखद अन् धक्कादायक : उपमुख्यमंत्री  
शिवसंग्रामचे नेते, आमचे सहकारी, माजी आमदार विनायक मेटे यांच्या अपघाती निधनाचे वृत्त अतिशय दुःखद आणि धक्कादायक आहे, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. मराठा समाजाचे कल्याण हे त्यांचे जिव्हाळ्याचे विषय होते आणि त्यासाठी त्यांनी मोठा संघर्ष उभारला अशा आठवणींना फडणवीस यांनी उजाळा दिला.
मेटे यांचे निधन मनाला लावणारे :  भुजबळ
शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचं आज पहाटे अपघाती निधन झाल्याची दुःखद बातमी ऐकून तीव्र दुःख झाले असून मेटे यांचे अकाली निधन मनाला चटका लावणारे आहे अशा शोकभावना राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केल्या आहे.
 संघर्षशील नेता हरपला : पटोले
शिवसंग्राम संघटनेचे नेते माजी आमदार विनायक मेटे यांचा झालेला अपघाती मृत्यू धक्कादायक आणि अत्यंत दुःखद आहे. मराठा आरक्षणाच्या लढ्यात त्यांचं मोठं योगदान होतं. मेटे यांच्या निधनाने एक संघर्षशील नेता हरपला आहे, अशी शोकभावना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केली आहे.

    Post Views:  196


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व