लोकशाहीला हादरे देणारे सत्तांतराचे विनाशी पायंडे ...! : संजय एम.देशमुख मोबा. क्र . ९८८१३०४५४६
विश्वप्रभात न्यूज ब्युरो
23 Jun 2022, 12:27 PM
राजाविरूध्द कटकारस्थानाने राजकीय तत्वप्रणाली आणि मानवी जीवनमुल्यांची वाट लावून बळजबरी आणि प्रसंगी रक्तपातानेही राजसिंहासन बळकावण्याचे पेशवाईतील दिवस परत पुढे आलेत की काय असे महाराष्ट्रातील राजकीय भुकंपाचा घटनाक्रम पाहून वाटायला लागले आहे. अनैतिकांना ना लाज ना लज्जा या प्रकारातून अमर्याद सत्ता हस्तगत करण्यासाठी राज्या राज्यातील सरकारे पाडली जात आहेत.तेथे लोकशाही आणि संविधानिक सर्व संकेत धाब्यावर बसवून पळवापळवी, अपहरणातून बळजबरीने सत्ता हिसकावण्याचे माफियाराज या देशात भाजपने सुरू केलेले आहे.
कोणतेही सरकार आले की त्यांना कोणतीही विकासकामं करू द्यायची नाहीत,संकटात त्यांना सहकार्य करण्याच्या लोकशाहीतील संविधानिक संकेतांची पायमल्ली करायची,आणि त्यातील उणीवा शोधून त्यांना बदनाम करायचे. ही कुटील कपटनीति भाजपप्रमाणे देशातील कोणत्याही पक्षाला आजपर्यंत साध्य झाली नव्हती.असे म्हणण्यापेक्षा लोकशाही आणि राजकीय नीतिमुल्ल्यांच्या चौकटी पार करून नुसती बेइमानी,अनैतिकता, पाडापाडी ,अपहरणातून बळजबरी करण्याची एवढी असभ्य आणि बेशरमपणाची कृत्त्ये करण्याची हिंमत कॉंग्रेस आणि कोणत्याही पक्षाने केली नाही. कारण स्वातंत्र्यलढ्यातील थोर नेत्यांच्या संस्कारात विस्तारलेला, आपली समाज आणि देश निष्ठेची एक वेगळी परंपरा निर्माण करणारा एक सुसंस्कृत पक्ष म्हणून तो सिध्द होता आणि आहे. लोकशाही व जीवनमुल्यांचा अंगीकार करणारा पक्ष म्हणून कॉंग्रेसची ओळख आहे. तो स्वार्थ,मतलबासाठी नीतिमत्ता सोडणाऱ्या अराजकवादी मवाल्यांचा पक्ष नव्हता.अर्ध्या रात्रीत किंवा झोपेतून लोक उठण्याअगोदरच उताविळपणे सत्तेची शपथ घेणाऱ्या नेत्यांचा, गुडघ्याला अगोदरच बाशिंग बांधणाऱ्या सत्तांतूर हपापल्या अधाशी लोकांचा पक्ष अशी त्यांची प्रतिमा कधी नव्हती,आणि आजही नाही.दुराचाऱ्यांपुढे सारंच हतबल होण्याचा हा विनाशी काळ येथे अवतिर्ण झालेला आहे.सध्या घडणारे प्रकार म्हणजे माथेफिरू तरूणाने एखाद्या तरूणीवर एकतर्फी प्रेम करणारे जबरदस्तीच्या तमाशासारखे आहेत." तू मेरी नहीं तो और किसी की भी नही हो सकती " म्हणणाऱ्या मनोविकृत तरूणाच्या वैचारिक पातळीलाही लाजवेल इतका हा इरसाल बेशरमपणा आहे.
एका रीक्षाचालकापासून तर शिवसेनेचा प्रतिष्ठीत नेता,आमदार,मंत्री,गटनेता आणि त्यापूर्वी मुलाला खासदारकी एवढं मोठं घबाड शिवसेनेने दिल्यावरही एकनाथ शिंदे आमदारांना घेऊन भाजपच्या संरक्षणात सुरतला जाऊन बसले,आणि आज गुवाहाटीत येऊन आपले शक्तीप्रदर्शन करते झाले. ज्यांनी आणि ज्या पक्षाने मोठे केले त्यांनाच शह देण्याचा बदलेल्या माणसाचा हा कृतघ्न खेळ आहे.या खेळीतून आघाडी सरकार पाडण्यात ते संख्याबळ आणि कायदेशीर पेचप्रसंगातून कितपत यशस्वी होतील याचे उत्तर येणाऱ्या कालावधितून मिळणार आहे.परंतू त्यांनी केलेली हिंमत हा ठाकरे घराण्याला आणि शिवसेनेला बसलेला आणखी एक हादरा आहे.तसा अनेक हादऱ्यांना तोंड देऊन परिणामांची चिंता न करणारा तो पक्ष आहे. उध्दव ठाकरेंची तशीच आणि एक परिपक्व विचारांचा संयमी नेता म्हणून एक वेगळी प्रतिमा सिध्द झालेली आहे.याबाबतित भाजपातील कोणीही नेता त्यांची बरोबरी करू शकणार नाही.
सध्याचा राजकीय भुकंप हा बेगडी हिंदुत्वाच्या भुलथापांना बळी पडून फक्त सत्तास्वार्थाच्या मलिद्यासाठी खेळला जाणारा डाव आहे...! कमावली ती अनैतिक माया कोतवालांपासून सुरक्षित ठेवण्यासाठी ईडी आणि सिडीच्या दबावाखाली घडविलेला कारनामा आहे....! हे भाजपच्या स्वतःच्या पक्षातील बेईमान ,भ्रष्टाचारी बाजूला ठेऊन फक्त विरोधकांवरच ईडीचे वार करीत त्यांना घायाळ करण्याच्या शकूनी कपटनीचे महानाट्य आहे. एकामागोमाग सरकारे पाडण्याच्या ईतिहासातून हेच स्पष्ट झालेले आहे.फक्त महाराष्ट्रासाठी वारंवार पचांगं पाहूनही अपेक्षित वेळेत हा हादरा देता आला नव्हता हे भाजपचे अपयश होते.शेवटी नाथाच्या एकनिष्ठ नाथालाच पळवून त्याआडून वार करणे ही लोकशाहीशी प्रतारणा व जनतेच्या विश्वासाला हादरा देण्याचे कपटकृत्त्य पून्हा येईन म्हणणाऱ्यांनी अखेर सुरू केलेच.या शुद्रपणात कोणाचे पात्र यशस्वी होईल हा एक औत्सुक्याचा विषय आता ठरलेला आहे.
अगोदर उल्लेख केल्याप्रमाणे कॉंग्रेसला वैचारिक दिशेने आणि तशाच राजकीय आणि लोकशाहीवादी नीतिमुल्यांप्रमाणेच वाटचाल करण्याचा वारसा आहे. कमी अधिक फरकाने त्याच पध्दतीने राजकीय वाटचाल करणारे इतर छोटे मोठे विचारी शांततावादी पक्षही होते आणि आहेत. याला शरद पवारांच्या आणि इतर राज्यातील प्रादेशिक पक्षांच्या राजकीय घडामोडी तेवढ्या अपवाद होत्या.शिवसेनासुध्दा सामाजिक कर्तव्य आणि मानवी जीवनमुल्ये तथा शास्त्रातील मानवतादाच्या संकेतांनी स्विकारलेले हिंदुत्व घेऊन चालणारा पक्ष आहे.ती हिंदुहृदयसम्राट बाळासाहेबांच्या नेतृत्वात खऱ्या छपन्न इंची निधड्या छातीच्या माणसातील वाघांनी जोपासलेली संघटना आहे. ती कर्तृत्व आणि एकनिष्ठ विचारांच्या प्रभावाने मंतरलेली एक विचारधारा आणि नंतर एक पक्ष आहे.बेगडी हिंदुत्वाचे कार्ड वापरून अनैतिक धुडगूस घालणारा बाळासाहेबांच्या शिस्तीतला तो पक्ष नाही. हे ढोंगी आणि विश्वासघातकी राजकारण्यांनाही चांगल्याप्रकारे माहिती आहे.
उध्दव ठाकरेही त्या संस्कारात वाढलेले एक सुसंस्कारी, अभ्यासू, स्वाभिमानी, समाजशील,आणि परीपक्व विचारांचे संयमशील नेते आहेत.ते राजीनामा देऊन मोकळे होतील,परंतू अशा अनैतिक भिकारचोट उपद्व्यापांमध्ये आपल्या तत्व आणि विचारांशी तडजोड मात्र कदापीही करणार नाहीत. कारण अशा नेत्यांप्रप्रमाणे स्वाभिमानाला तिलांजली देऊन आपली अस्मिता गहाण ठेवणारं ते नेतृत्व नाही.निरोगी वैचारीक परंपरा,आदर्श आणि सुसंस्कारीत समाजव्यवस्थेतील खानदानी घराण्यात जन्मलेले असेच वेगवेगळ्या पक्षाचेही वारसदार आहेत.त्यांच्या स्पर्धेत उतरलेल्या सध्याच्या अनैतिक अवदसेने भारतातील सर्व निरोगी पक्षांना गारद करून लोकशाहीला संपविण्याची पापे सुरू केलेली आहेत. भारतीय कुटूंब व्यवस्थेतील कुलीन लोक पाठीत खंजीरधीच खूपसणार नाहीत. सर्व विकून मोकळे झालेले लाजलज्जा सोडून काहीही करायला तयार होतील, ह्या घटना आता नित्त्याच्याच झालेल्या आहेत. ही भारतिय लोकशाहीवादी सभ्य राजकारणाची रसातळाला जाणारी एक शोकांतिका आहे.
आज जे भाजपला जमलं,किंवा जमलं म्हणण्यापेक्षा वैचारीकता आणि नीतिमुल्यांना फाटा देऊन चोरवाटाचा हा अवलंब आहे. त्याचा वापर अनेक राज्यांचे गड काबिज करण्यासाठी भाजप करत आहे. या राजकीय भुकंपांचे पायंडे भारतिय राजकारणातील युवाशक्तीवर दुरगामी अनिष्ठ परिणाम करणारे ठरणार आहेत.कारण योग्य आणि लोकशाहीच्या संविधानिक मार्गाने जर सत्ता मिळू शकत नसेल,निवडणूक जिंकता येत नसेल, तर अराजक निर्माण करा,...गुंडगीरी करा,... साम, दाम, दंडभेदाची नीति वापरून आपल्या बाहूबलीय माफीयागीरीचे दर्शन घडवून आमदार खासदारांना आपल्या बाजूला वळवा....प्रसंगी त्यांच्यावर खोटे गुन्हे नोंदवल्या जातील म्हणून सांगा. त्यांच्या भ्रष्टाचाराची लक्तरे बाहेर आणण्यासाठी आपणच पोसून ठेवलेल्या ईडी आणि सीबीआयच्या तपासयंत्रणाचे वणवे पेटवणारे टेंभे त्यांना दाखवा.व्यभिचारांना बाहेर आणण्यासाठी सिड्या वाजवा...गाजवा. यातलं काहीही आणि कशाही प्रकारे करा,परंतू प्रतिस्पर्धी पक्षाकडून सत्ता मात्र हिसकावून आणा. असेच आदर्श, नव्हे अनादर्श हे भारतिय राजकारणातील युवा पिढीच्या डोक्यात भिनवून पक्के करण्याची प्रचंड विनाशी आणि अराजकतावादी पापे भारतीय जनता पक्ष या देशात करीत आहे.
जागोजागी समाज,देशनिष्ठा लोकशाहीची बांधिलकी पायदळी तुडविली जात आहे.आनंद,विकास आणि शांतता तथा विधाकतेच्या अमृताला देश पारखा झालेला आहे. त्याऐवजी गुन्हेगारी, दडपगीरी, असहिष्णुततेतून वैरत्व आणि व्देशपूर्ण विचारातील राजकीय सुडबुध्दीचे विष जागोजागी शिंपडले जात आहे. देशाच्या लोकशाही आणि संविधानावर या अनैतिक अवदसेच्या घोंघावणाऱ्या वादळाला नि:ष्प्रभ करणे ही सुध्दा देशाच्या सिमारक्षणाएवढेच महत्वपूर्ण काम आता ठरलेले आहे.एकदा बाहेरील शत्रूशी तरी उघडपणे दोन हात करून त्याला पराजित करता येईल.परंतू लाजलज्जा गुंडाळून अराजक निर्माण करणाऱ्या, आणि प्रसंगी मानवता व जीवनमुल्यांवरही छूपे वार करणारांचा समाचार घेणे ही काळाची गरज आहे. राजकीय सामाजिक क्षेत्रात अशांततेची वादळे निर्माण करणारे घरभेदी शत्रू हे बाहेरील दुष्मनांपेक्षा खतरनाक असतात.त्यांना देश, समाज, माणसे, निष्ठा, कर्तव्य, प्रामाणिकता, बांधिलकी या गोष्टींशी काहीही देणे घेणे नसते.बस निर्दयीपणे हातात साम दाम दंडभेदाची शस्त्रे घेऊन येणाऱ्या अडथळ्यांना संपवित त्यावर अघोरी आनंदाने नाचत पुढे चालत राहणे, हाच त्यांचा नृशंस खेळ असतो.म्हणून देशातील जनता आणि मतदारराजांनी त्यांच्याच राजछत्रावर आक्रमण करून परत पेशवाईचे वारे निर्माण करणाऱ्या विषवल्लींचा बिमोड करण्यासाठी पुढे आले पाहिजे.नाहीतर आत्ताच जीवनमानाच्या अनेक समस्यांमध्ये देशातील जनता होरपळून निघत आहे.त्यात अशा विनाशकारी नेत्यांच्या खेळखंडोबाने आपल्याच तिजोऱ्यांची विल्हेवाट लागत भारताचा लवकर श्रीलंका होऊ नये.
यासाठी जागे व्हा....! आपली लोकशाहीतील हक्काची शस्त्रे घेऊन कायदेशीर लढ्यासाठी पुढे येत रहा.....!आता चुपचाप बसण्याचे दिवस राहिले नाहीत.आपले अनेक नेतेही विकाऊ...बेईमान आहेत. म्हणून आपले रक्षण आपणच करण्यासाठी आता उठाव झाले पाहिजेत....अगदी इंग्रज राजवटीत झाले तसेच....! काळ कुणासाठी थांबत नाही....थांबला नाही....थांबणारही नाही....! म्हणून सामाजिक अधोगती टाळण्यासाठी आपल्या आणि भावी पिढीच्या कल्याणाचे निर्णय वेळ निघून जाण्यापूर्वी आपणास घ्यावे लागणार ही गोष्ट मतदारांनी लक्षात घेतली पाहिजे...अन्यथा विनाश अटळ आहे....!
संजय एम.देशमुख
मोबा. क्र . ९८८१३०४५४६
Post Views: 383