स्व.बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेची प्रतिमा तथा वाटचालीबाबत स्मिता दळवी गायकवाड, मु़ंबई यांचा स्वानुभवावर आधारीत .....! बाळकडू पचनी पडलं ...


 स्मिता नरहरी दळवी  2021-11-23
   

शिवसैनिक... खरंच बालपणी बरेचदा कुणीही म्हटलं तुझे पप्पा शिवसैनिक आहेत ना? त्यावर मी काहीच उत्तर देत नसे कारण मलाच त्या बालवयात कळत नव्हतं की शिवसैनिक म्हणजे नेमकं काय, पण ते कालांतरानं समजत गेलं... 
 
नंदिनी संध्याकाळी साहेब (मा. बाळासाहेब ठाकरे) येणार आहेत गं... तयार रहा असं आमच्या विभागाच्या शाखाप्रमुखांची आई माझ्या आईला सकाळीच सांगून जायची किंवा बरेचदा शिवसेनेतील कार्यकर्त्या ताई आईला सांगायला यायच्या वहिनी संध्याकाळी तयार रहा गं... दादा (मा. मधुकर सरपोतदार) येणार आहेत.  आता संध्याकाळी काय आहे हे पहायला मी आईसोबत नेहमीच जायचे त्यावेळेस समजायचं... काय तो शिवसैनिकांनी भरलेला प्रांगण, सर्वत्र पेटत्या मशालीच मशाली कारण निवडणूक उमेदवाराची निशाणीच मशाल होती, त्यात सिंहगर्जनेसहित शिवछत्रपतींचा जयघोष व एकच जल्लोशात घोषणा आवाज कोणाचा... शिवसेनेचा  बस...! अजून काय पाहिजे, जणू आपल्या आसपास शिवछत्रपतींचे मावळेच गर्जना करत असल्याचा भास व्हायचा व ज्यावेळेस मा. बाळासाहेब ठाकरे व्यासपीठावर यायचे व आपलं भाषण सुरू करायचे त्या क्षणास ह्या गर्जनांचा आवाज अजूनच उत्स्फूर्तपणे काळजाला भिडायचा तो आजतागायत, साहेबांचा फोटो आजही पाहिला कि आतून एकच आवाज येतो आवाज कोणाचा... शिवसेनेचा इतकं ते वाक्य त्याकाळीच माझ्या बालमनावर कोरलं गेलं.  दादांच्या म्हणजे मा. मधुकर सरपोतदार यांच्या प्रचाराच्या त्या सभा त्याकाळी होत असत.  प्रचारसभा कुठेही, कोणत्याही वेळी असू देत न चुकता आई-पप्पांसोबत मी सुद्धा त्या सभेला जात असे, माझी इतर मोठी भावंडं येवोत न येवोत, मी मात्र आवर्जून जात असे.  ती माननीय मंडळी काय भाषण देत आहेत ते सगळंच समजण्याइतकी मी मोठी नव्हते पण तो जयघोष व शिवघोषणांनी दुमदुमलेला आसमंत मला त्या बालवयातच हवाहवासा वाटू लागला, असं वाटायचं या दोन्ही मान्यवरांची परखड वकृत्वाची प्रभावी व प्रवाही भाषणं कधी संपूच नयेत, अशीच ऐकत रहावीत कारण त्यांच्या प्रत्येक वाक्यानंतर शिवसैनिकांचा होणारा तो उत्स्फूर्त जयघोष आवाज कोणाचा... शिवसेनेचा 

बरं हा उत्साह निवडणूक व मिरवणूकी पुरताच मर्यादित नव्हता तर अगदी मतदानाच्या दिवशीही सकाळपासूनच मी पप्पांसोबत शिवसेनेच्या शाखेत हजेरी लावत असे, त्यावेळी काही समजत नसायचं आपण पप्पांसोबत इथे का आलो पण तो भगवामय झालेला आजूबाजूचा परिसर पाहून, पप्पांना जराही त्रास न देता ते तिथे थांबतील तितका वेळ मी शाखेत बसून सर्वांची चाललेली लगबग पाहत बसायची.  आई आम्हाला सांगायची, ज्या दिवशी माझा मोठा भाऊ निनाद जन्मास आला त्याच दिवशी मा. मधुकर सरपोतदारदादा पहिल्यांदा निवडून आले होते तेव्हा माझे पप्पा आईसोबत इस्पितळात जास्त न थांबता थेट त्यांच्या मिरवणूकीस निघून गेले होते व आईला त्याचं जराही वाईट वाटलं नाही कारण पप्पांचं शिवसेनेप्रती असलेलं निस्सीम प्रेम तिला समजलं होतं...  लहानपणी आम्ही मुलांनी कधी चुकून मा. बाळासाहेबांचं नाव एकेरी घेतलं की पप्पांना भयंकर चीड येत असे ते म्हणायचे "माननीय बाळासाहेब" म्हणा. 

शिवसेनेच्या सर्वच मोर्चे, निवडणूकीत, मिरवणूकीत, दसरा मेळाव्यांत आई-पप्पा इतक्या उत्साहाने सहभागी व्हायचे व घरात दोघांचे सतत तेच विषय, त्याच गप्पा.  पप्पा कामावर असले तरी आई मात्र घरातील सर्व कामं उरकून मोर्चे, मिरवणूकीत, प्रचार सभेंत व महिलांच्या होणा-या हळदीकुंकू समारंभास उत्साहाने सहभागी व्हायची.  पप्पांनी दोन कंपन्यांत नोक-या केल्या, पहिली लक्ष्मी रतन व नंतर जॉनसन्स टाइल्स इंडिया लिमिटेड, दोन्ही ठिकाणी बरीच वर्षे मा. मधुकर सरपोतदार हे पप्पांसोबतच सहकारी होते त्यामुळे पुढे दादांच्या निवडणूकीचा प्रचार करतेवेळी पप्पांचा आनंद अगदी ओसंडून वाहताना पाहिला.  दादा निवडणूक प्रचारासाठी आम्ही राहत असलेल्या विभागात आले की पप्पा आईला प्रचारात सहभागी असणा-या सर्व शिवसैनिकांसाठी व दादांसाठी पटकन टोपभर चहा ठेवायला सांगायचे कारण आई-पप्पा दोघांना माहिती होतं की मा. सरपोतदारदादा प्रचार करतेवेळी नुसतेच दारातून दोन शब्द बोलून पुढे जायचे नाहीत तर ते आमच्या घरात आत येऊन माझ्या आईची दोन शब्द विचारपूस करूनच पुढील प्रचारासाठी जायचे. 

ह्या अश्या वातावरणात बालपण गेलं. मी कधीच शाळेचा खाडा केला नाही किंवा कधी अर्ध्या दिवसाची सुट्टीसुद्धा घ्यावीशी मला वाटली नाही पण नवरात्रीच्या दिवसांत एक दिवशी दुपारी शाळेत निघताना आई म्हणाली आज संध्याकाळी चार-पाचच्या सुमारास आम्ही सर्व शिवसेनेच्या महिला शिवसेनाभवनात-दादरला तिथे स्थापित असलेल्या देवीची ओटी भरण्याकरीता जाणार आहोत... मग काय माझं मन शाळेत अजिबात लागलं नाही, मी माझ्या वर्गशिक्षिकांची परवानगी मिळवून कधी नव्हे ते पहिल्यांदाच मधल्यासुट्टीत घरी हजर झाले व तयार होऊन आई व इतर शिवसैनिक महिलांसोबत शिवसेनाभवनात-दादरला देवीच्या दर्शनास गेले.   हे असं शिवसेनेचं बाळकडू बालपणीच पचनी पडलं.

स्मिता नरहरी दळवी
खारघर, नवी मुंबई
९८३३८६४८८४

    Post Views:  396


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व